शिंदे गटाला हवा नाशिक शहरातील मतदारसंघ  File Photo
नाशिक

शिंदे गटाला हवा नाशिक शहरातील मतदारसंघ

Nashik, Maharashtra Assembly Election 2024 | पदाधिकारी घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकांमध्ये पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शिवसेना शिंदे गटाला विधानसभा निवडणुकीत नाशिक शहरातील चारपैकी किमान एक मतदारसंघ हवा आहे. आमच्याकडे सर्वच मतदारसंघात प्रबळ उमेदवार असल्याचा दावा करत शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते यांनी शहरातील किमान एक मतदारसंघ पक्षाला सुटावा यासाठी येत्या दोन दिवसांत पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.

नाशिक जिल्ह्यातील १५ मतदारसंघांपैकी मालेगाव बाह्य, नांदगाव या दोन मतदारसंघांत शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार आहेत. सहा मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे, पाच भाजपकडे व काँग्रेस आणि एमआयएमकडे प्रत्येकी एक मतदारसंघ आहे. नाशिक शहरातील चारपैकी एकही मतदारसंघ शिंदे गटाकडे नाही. यापैकी तीन जागा भाजपकडे, तर एक राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आहे. नाशिक शहरात शिंदे गटाकडे एकही जागा नसणे आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे भाजपच्या कोठ्यातील तीनपैकी किमान एक जागा आपल्याला मिळावी, अशी मागणी शिंदे गटातून पुढे आली आहे. यासंदर्भात उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी नाशिक शहरात चारपैकी एक जागा शिंदे गटाला मिळावी, अशी मागणी पुढे रेटली आहे. राज्यात महायुतीची सत्ता यावी, यादृष्टीने आम्ही विचार करत आहोत. त्यासाठीच महायुती म्हणून निवडणुका लढविल्या जात आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकांनंतर महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. नाशिक महापालिका क्षेत्रात शिंदे गटाकडे एकही मतदारसंघ नसणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने योग्य नाही, असे पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शहरातील चारपैकी किमान एक जागा शिंदे गटाला सुटावी, यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून, त्यांना एका जागेसाठी गळ घातली जाणार आहे. नाशिक शहर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला कायम राहण्यासाठी पक्षाचा आमदार शहरात असायला हवा, अशी पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भूमिका असल्याचे बोरस्ते यांनी सांगितले.

----

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT