ठळक मुद्दे
सिन्नरमध्ये मेंढ्या चोरीचे प्रकार वाढले
मेंढ्या चोरीचे सत्र : पोलिसात तक्रारीसाठी मिळणारी मेंढपाळांना अपमानास्पद वागणूक
नाशिक-पुणे महामार्गावर दोडी मेंढपाळांचा रास्ता रोको
सिन्नर ( नाशिक ) : तालुक्यात मेंढ्या चोरीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. धोंडवीरनगर व दोडी येथे झालेल्या घटनांनंतर वावीजवळील दुसंगवाडी शिवारात पुन्हा एकदा चोरट्यांनी धाडस करत तब्बल 20 मेंढ्या पळविल्या. या घटनेत गोराणे वस्तीवरील आनंदा त्र्यंबक गोराणे यांचे अंदाजे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. मेंढ्या चोरीचे सत्र आणि पोलिसात तक्रार देण्यास गेल्यानंतर मिळणारी अपमानास्पद वागणूक याच्या निषेधार्थ धनगर समाज बांधवांनी शुक्रवारी (दि.29) सकाळी नाशिक-पुणे महामार्गावर दोडी (म्हाळोबा फाटा) येथे रास्ता रोको आंदोलन केले.
शनिवारी (दि. 23) रात्री रिमझिम पावसाचा व अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी गोराणे यांच्या कळपातील वाघूर फोडून 70 मेंढ्यांपैकी 20 मेंढ्या चोरून नेल्या. यापूर्वी धोंडवीरनगर येथे व दोडी येथे मेंढ्या चोरीला गेल्याच्या घटना घडल्या असून, या सर्व घटनांचा परस्परांशी संबंध आहे का, याचा तपास वावी पोलिस करत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार देवीदास चौधरी तपास करीत आहेत. तथापि, या घटनांनी तालुक्यातील मेंढपाळांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून पोलिसांनी तातडीने ठोस कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी होत आहे. मेंढपाळांनी आपल्या कळपासह रास्ता रोको करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. वावी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे यांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मेंढपाळांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात सखाराम सरक, सुरेश कोळपे, आनंदा कांदळकर, दीपक सुडके, लक्ष्मण बर्गे, एकनाथ देवकर, डॉ. कल्पेश शिंदे, भाऊसाहेब ओहळ, बबन भडांगे, लक्ष्मण हजारे, राजु चोरमले, भाऊसाहेब गोराणे, सुभाष कोळपे, बाळु शिंदे, झुंबर लकडे आदींसह मोठ्या संख्येने मेंढपाळ बांधव सहभागी झाले होते.
मेंढ्यांच्या कळपाला धनगर बांधव 'वाडा' असे म्हणतात. हा वाडा हलवावा की नाही आणि हलवला तर कोठे हलवावा, असा प्रश्न निर्माण झाला असल्याचे आंदोलनादरम्यान काही धनगरबांधवांनी बोलून दाखवले. बकऱ्या विकून हा व्यवसाय बंद करण्याचा विचारही आमच्या मनात येत असल्याचे ते म्हणाले.
मेंढ्या चोरीच्या सलग सुरू असलेल्या घटनांमुळे तालुक्यातील मेंढपाळ भयभीत झाले असून पोलिस प्रशासनाने गांभीर्याने उपाययोजना करावी, अशी मागणी मेंढपाळांनी केली. जर चोरांचा बंदोबस्त तात्काळ झाला नाही तर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा देण्यात आला.
आंदोलनावेळी धनगर समाज बांधवांनी, आम्हाला शासनाकडून पाणीयोजना, घरकुल अशा कोणत्याही योजनांचा लाभ नको, फक्त संरक्षण द्या अशी मागणी केली. स्वसुरक्षेसाठी मेंढपाळांना शस्त्र परवाना द्यावा,तसेच पाच फूटांपेक्षा उंचीच्या जंगलांमध्ये शेळ्या-मेंढ्यांना चारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.