नाशिक : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना साथ देणा-या नाशिक जिल्हयाने विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ दिली. असे असले तरी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकण्यासाठी शरद पवार यांनी नाशिक जिल्हयाची निवड केली आहे.
14 सप्टेंबर रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाचे राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिर आयोजीत केले आहे. तर, 15 सप्टेंबरला शेतक-यांच्या प्रश्नी पवारांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमाचे नियोजन शहर व जिल्हा राष्ट्रवादीकडून सुरू झाले आहे.
प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी सहा आॅगस्ट रोजी नाशिक येथे बैठक घेत, कांदा उत्पादकांसह शेतक-यांच्या प्रश्नासाठी पक्षाचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये महामोर्चा काढण्याची घोषणा केली होती. तसेच पक्षाचे एक दिवसीय शिबिर घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाणार असल्याचे यावेळी सांगितले होते. त्या अनुषगांने 20 आॅगस्ट रोजी मुंबईतील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष शिंदे यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक झाली. यात 14 व 15 सप्टेंबर रोजी शरद पवार नाशिक जिल्हा दौ-यावर येतील. त्यांच्या उपस्थितीत 14 सप्टेंबरला पक्षाचे शिबिर होईल. यात प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणणीतीवर चर्चा होऊन, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टी मदत, दुधाला भाव आदी शेतक-यांच्या मागण्यांसाठी
15 सप्टेंबरला पवार यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चा काढण्यात येणार आहे. पक्षाचे शिबिर हे नाशिक शहरात होणार असून त्यांचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. शिबिर व महामोर्चा यांच्या नियोजनाच्या अनुषगांने शनिवारी (दि.30) पक्षाच्या कार्यालयात शहर व जिल्हा राष्ट्रवादीची बैठक झाली. बैठकीत मोर्चासाठी तालुकानिहाय नियोजन करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. शरद पवार शिबिरात मोर्गदर्शन करणार असून पुढील दिशा स्पष्ट करणार आहे. तसेच शेतक-यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा होत आहे. त्यामुळे मोर्चा व शिबिर यशस्वी करण्याची जबाबदारी कार्यकर्ते व पदाधिका-यांवर असल्याने सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांनी यावेळी केले. बैठकीला जिल्हा प्रभारी सुनील भुसारा, खासदार भास्कर भगरे, प्रदेश उपाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, माजी आमदार दिपीका चव्हाण, संजय चव्हाण, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, शहराध्यक्ष गजानन शेलार, महिला अध्यक्षा संगिता पाटील, पुरूषोत्तम कडलग, उदय सांगळे, माणिकराव शिंदे यांसह तालुका अध्यक्ष, कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थितीत होते.