नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री शरद पवार हे शनिवारपासून (दि.१३) चार दिवस जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. पवार यांच्या उपस्थितीत रविवारी (दि.१४) पक्षाचे शिबीर होत असून सोमवारी (दि.१५) त्यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यानंतर पवार हे पहिल्यांदाच जिल्ह्यात येत आहे. शेतकरी मोर्चातून ते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे रणशिंग फुंकणार आहे. त्यामुळे पवार नेमके काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच दौऱ्यावर आलेल्या प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राज्यातील पहिला शेतकरी मोर्चा नाशिकमधे काढण्याचा निर्धार केला होता. त्याचवेळी पक्षाचे एकदिवसीय शिबिर घेण्याची घोषणाही त्यांनी केली होती. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी शिबिराचे ठिकाण निश्चित करत त्याची जबाबदारी निश्चित करण्याकरिता गत आठवडयात पक्षाची बैठक घेतली. रविवारी सकाळी १० वाजता स्वामीनारायण मंदिराच्या सभागृहात हे शिबीर होत आहे. या निमित्ताने खासदार पवार हे जिल्हा दौऱ्यावर येत असून शनिवारी त्यांचे नाशिक येथे आगमन होईल. शनिवारी आंबे दिंडोरी येथील कै. दादासाहेब गायकवाड पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात येईल. रविवारी पक्ष कार्यकर्त्यांच्या शिबिराला उपस्थितीत राहून ते मार्गदर्शन करणार आहे.
सोमवारी (दि.15) सकाळी ११ वाजता अनंत कान्हेरे मैदान येथून आक्रोश मोर्चा निघेल. गोल्फ क्लब, गडकरी चौक, सी. बी. एस. ते जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन देऊन मोर्चाचे सभेत रूपांतर होईल. शिबिर व मोर्चासाठी प्रदेशाध्यक्ष शिंदे, माजीमंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांसह प्रमुख पदाधिकारी, आमदार खासदार उपस्थित राहणार आहेत.
मोर्चाचे नियोजन जिल्हा प्रभारी माजी आमदार सुनील भुसारा, ग्रामीण जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार यांच्यासह पदाधिकारी करत आहेत. या व्यतिरीक्त चार दिवसांमध्ये विविध ठिकाणी उद्घाटन व कार्यक्रमांचे नियोजन आहे.