Sharad Pawar
भुजबळांची घुसमट होत असल्याचा आरोप  Pudhari Photo
नाशिक

नाशिकचे शेकडो पदाधिकारी शरद पवारांच्या गटात; अजित पवार यांना धक्का

सोनाली जाधव

बारामती : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नाशिक शहर उपाध्यक्ष नानासाहेब महाले यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी आज (दि. ७) गोविंदबागेत ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे. दरम्यान महायुतीमध्ये मंत्री छगन भुजबळ यांची घुसमट होत असल्याचा आरोप यावेळी नाशिक शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी बारामतीत केला.

भुजबळांची घुसमट होत असल्याचा आरोप

लोकसभा निवडणूक संपताच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये चलबिचल सुरु आहे. त्याचा प्रत्यय आज (दि. ७) बारामतीत आला. महाले यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करत अजित पवार यांना धक्का दिला. माजी आमदार नितीन भोसले यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यांच्यासह नाशिक मधील असंख्य पदाधिकारी रविवारी सकाळी गोविंद बागेत आले होते. त्यांनी शरद पवारांची भेट घेतली व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

दरम्यान नाशिकमध्ये नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी माजी केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा मोठ्या मतांनी पराभव केला. राज्यातील नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मोठे यश मिळवले आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असलेली सहानुभुती लक्षात घेता विधानसभा निवडणूकीपर्यंत मोठ्या प्रमाणात पक्षांतर होण्याची चिन्हे आहेत.

भुजबळ यांना परत घेतले जाणार नाही

महायुतीमध्ये मंत्री छगन भुजबळ यांची घुसमट होत आहे. परंतु त्यांना परत यायचे असले तरी शरद पवार त्यांना घेणार नाहीत. त्यांचे परतीचे दोर कापले आहेत अशी टीका नाशिक शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी यावेळी केली. आगामी निवडणूकीत आम्ही नाशिकमधून दहा ते बारा जागांची मागणी शरद पवार यांच्याकडे केली असून त्या जागा निश्चित निवडून आणू असे नानासाहेब महाले म्हणाले.

SCROLL FOR NEXT