त्र्यंबकेश्वर : येथील श्री शंभू पंचायती अटल आखाड्यात गणेश चतुर्थी उत्सवानिमित्त सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीला सुरुवात करण्यात आली आहे. अटल आखाड्याची इष्टदेवता भगवान गणेश असल्याने गणेश चतुर्थीच्या औचित्याने साधू-संतांसाठी भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. कुंभमेळा हा फक्त धार्मिकच नव्हे, तर सामाजिकदृष्ट्याही महत्त्वाचा उत्सव असल्याने त्याची सांगता पर्यावरणपूरक पद्धतीने व्हावी यासाठी आखाडा कटिबद्ध आहे. वृक्षारोपण आणि हरितकुंभ संकल्पना राबवून मेळा पर्यावरणपूरक करण्याचा मानस साधू-महंतांनी व्यक्त केला.
यावेळी सचिव महंत बटूक गिरी व महंत मुखत्यार पुरी यांनी सांगितले की, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर नियोजन सुरू आहे. यामध्ये साधारण 15 हजार साधू आणि भाविक सहभागी होतील. त्यांच्या निवास, स्वच्छतागृहे व इतर आवश्यक सोयी सुविधा उभारण्यासाठी आखाड्याच्या जागेत कामाला सुरुवात करण्यात येत आहे.
यावेळी सांगण्यात आले की, शासनाने साधू-संत आणि भक्तांसाठी आवश्यक मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. निवाराशेड, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी व वीज या सुविधांना प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. प्रयागराज कुंभमेळ्याप्रमाणेच शासनाचा दृष्टिकोन येथेही सकारात्मक असावा, अशी मागणी करण्यात आली. शासनाच्या मदतीने उभारलेली रस्ते, पथदीप, पाणीपुरवठा यांसारखी कामे फक्त साधूंसाठीच नव्हे तर सर्वसामान्यांसाठी उपयुक्त ठरतात, हेही नमूद करण्यात आले.
याप्रसंगी श्री महंत मंगत पुरी, सचिव बटूक गिरी, सचिव मुखत्यार पुरी, श्री महंत सत्यम गिरी, सनातन भारती, पवन गिरी, सुंदर गिरी, प्रमोद गिरी, गोविंद गिरी, सतीश गिरी, पद्मनाभ गिरी, आनंद गिरी महाराज, ठाणापती दीपेंद्र गिरी महाराज यांच्यासह दशपुत्रे मंडळी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. संत भोजनप्रसंगी भक्त महेंद्र मिस्त्री, माजी नगराध्यक्ष ललित लोहगावकर, कैलास देशमुख, रमेश झोले, जीवन नाईकवाडी यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.