नाशिक : कोट्यवधी रुपयांच्या शालार्थ आयडी घोटाळ्यातील सर्व आरोपींच्या जामीन अर्जांवरील सुनावणी येत्या ५ जानेवारी रोजी होणार आहे. या प्रकरणात आतापर्यंत पाच स्वतंत्र गुन्हे दाखल असून एकूण २५ संशयित आहेत. प्रत्येक आरोपीने स्वतंत्रपणे जामीन अर्ज दाखल केल्यामुळे न्यायालयासमोर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे सर्व जामीन अर्जांची एकत्रित (क्लब करून) सुनावणी एकाच दिवशी घेण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये तत्कालीन शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांचाही समावेश आहे. त्यांना यापूर्वी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला असून, ५ जानेवारी रोजी त्यांच्या नियमित जामीन अर्जावरही निर्णय अपेक्षित आहे. तसेच माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी हे ४ डिसेंबरपासून पोलीस कोठडीत आहेत. नाशिक आयुक्तालय हद्दीतील एका गुन्ह्यात त्यांना जामीन मिळाला असला, तरी तत्काळ नाशिक ग्रामीण पोलिसांच्या पथकाने कारागृहातून त्यांचा ताबा घेतला.
या शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. हे पथक सध्या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या घोटाळ्यातील बहुतांश गुन्हे मालेगाव येथे दाखल असल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे, तपासाच्या सुरुवातीला भाऊसाहेब चव्हाण हे या प्रकरणात फिर्यादी होते. मात्र तपास पुढे जात असताना या घोटाळ्यात त्यांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना आरोपी करण्यात आले. याशिवाय, तपासात फेरफार केल्याच्या आरोपावरून नाशिक रोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी अशोक गिरी यांना यापूर्वीच पोलीस आयुक्तालयाकडून निलंबित करण्यात आले आहे. या बहुचर्चित शैक्षणिक घोटाळ्याच्या पुढील सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.