नाशिक : शहरातील वडाळा परिसरात असलेल्या एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिला कर्मचार्यांच्या लैंगिक शोषणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी पोलिसांनी एकूण नऊ गुन्हे दाखल करून सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
आठ महिलांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. त्यामध्ये लैंगिक शोषण, अश्लील शेरेबाजी, विनयभंग, मानसिक छळ तसेच धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर, एका पुरुष कर्मचार्याचे जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याची बाबही तपासात समोर आली आहे.
अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने 10 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. विशेष बाब म्हणजे, पीडित महिलांनी या संदर्भात कंपनीच्या पुणे येथील मुख्य कार्यालयातील एचआर विभागाकडे वेळोवेळी ई-मेलद्वारे तक्रारी नोंदवल्या होत्या. मात्र, या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप असून, संबंधित एचआर विभाग प्रमुख महिलेवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. हा प्रकार जुलै 2022 पासून ते मार्च 2026 पर्यंत सातत्याने सुरू होता.
विशेष तपास पथकाची स्थापना
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.
अश्लील हावभाव, चुकीचे स्पर्श
यातील आरोपींची नावे दानिश शेख, तौसिफ अत्तार, रजा मेमन, शाहरूख कुरेशी, शफी शेख आणि आसिफ अन्सारी अशी आहेत. त्यांनी कंपनीतील महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले, तर काहींनी कार्यालयीन परिसरात, लॉबीमध्ये आणि मीटिंगदरम्यान अश्लील हावभाव केल्याचा आरोप आहे. महिलांच्या शरीरावरून टिपणी करणे, एकटक पाहणे, जाणीवपूर्वक स्पर्श करणे, वैयक्तिक आयुष्याबद्दल लज्जास्पद प्रश्न विचारणे असे प्रकार सातत्याने घडत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
नमाज पठणास भाग पाडल्याचा आरोप
काही प्रकरणांमध्ये आरोपींनी हिंदू धर्मातील देवतांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये केली, पीडितांना जबरदस्तीने नमाज पठण करण्यास भाग पाडले आणि मांसाहारासाठी भाग पाडून धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. काही आरोपी महिला कर्मचार्यांचा पाठलाग करून त्यांना मानसिक दबावाखाली ठेवत असल्याचेही समोर आले आहे.