सिडको : कामठवाडे परिसरात पोलीस असल्याचे सांगत दोन भामट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची ४२ ग्रॅम सोन्याची साखळी व अंगठी लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलिसांनी दोन अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमनाथ खैरनार (वय ७१, रा. विखे पाटील शाळेजवळ) हे अभियंतानगर, कामठवाडे भागातील जावयाच्या दुकानामागे उभे असताना दुचाकीवरून दोन व्यक्ती तेथे आले. त्यांनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगत परिसरात चोरी झाल्याचे खोटे कारण पुढे केले. त्यानंतर खैरनार यांच्या हातातील व गळ्यातील दागिने सुरक्षिततेसाठी काढावे, असा सल्ला दिला.
त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून खैरनार यांनी ४२ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी व अंगठी काढून संशयितांच्या सूचनेप्रमाणे रुमालात ठेवली. मात्र, दोघांनी हातचलाखी करून रुमालातील दागिने चोरून दुचाकीवरून त्रिमूर्ती चौकाच्या दिशेने पलायन केले.
काही वेळातच आपण फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर खैरनार यांनी आरडाओरडा केला. मात्र तोपर्यंत आरोपी फरार झाले होते. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगविंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.