सराईत गुन्हेगारासह तिघांकडून 'एमडी' जप्त Pudhari Photo
नाशिक

Nashik Crime | सराईत गुन्हेगारासह तिघांकडून 'एमडी' जप्त, महिलेचा सहभाग

८.२२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : खून, मारहाणीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारासह इतर दोघांकडून अमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई करीत सुमारे १०० ग्रॅम वजनाचे मॅफेड्रॉन (एमडी) जप्त केले. संशयितांमध्ये महिलेचाही समावेश असून, त्यांच्याकडून एक कार जप्त केली आहे.

फैसल उर्फ दाढी शफी शेख (२६), शिबान शफी शेख (२५) व हीना शिबान शेख (तिघे रा. आर्टिलरी सेंटर रोड, उपनगर) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. तिघांपैकी शिबानविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. अमली पदार्थविरोधी पथकाचे अंमलदार अनिरुद्ध येवले यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. रविवारी (दि. १३) सायंकाळच्या सुमारास कार (एमएच १५, सीएम ९७१०) मधून तिघे संशयित रेल्वेस्थानक परिसरातून जात असताना पथकाने कार थांबवली. तिघांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे चार लाख ९७ हजार ५०० रुपयांचा ९९.५ ग्रॅम एमडीचा साठा आढळला. पोलिसांनी तिघांसह अमली पदार्थ साठा व कार असा एकूण ८ लाख २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नाशिक रोड पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांनाही अटक करून नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पुरवठादार- खरेदीदारांचा शोध सुरू

पोलिसांच्या प्राथमिक तपासात संशयितांनी 'एमडी'चा साठा मुंबईतून आणल्याचे उघड होत आहे. हा साठा ते नाशिक शहरात विक्री करणार असल्याचे समजते. मात्र त्याआधीच पोलिसांनी संशयितांची धरपकड केली. याआधीही संशयितांनी एमडीचा साठा शहरात आणला होता का? तो कोणाला विक्री केला व कोणाकडून घेतला याची माहिती पोलिस घेत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT