Nashik Kalaram Mandir 
नाशिक

Nashik Kalaram Temple | त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगीसह काळाराम मंदिरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात

Nashik Kalaram Temple | यंत्रणा सतर्क : धमकीच्या ई-मेलनंतर सायबर सेलकडून तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळांना बॉम्बने उडवण्याच्या धमकीचा प्रकार समोर आल्याने पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे. प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, सप्तशृंगीगड आणि ऐतिहासिक श्रीकाळाराम मंदिराची सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाने तातडीने खबरदारीच्या उपाययोजना करताना सायबर सेलच्या माध्यमातून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.

ऐन दिवाळीत सलग सुट्ट्यांमुळे मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी वाढलेली असतानाच मिळालेल्या धमकीमुळे खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगीगड या दोन महत्त्वाच्या देवस्थानांना धमकीचा ई-मेल आल्याची माहिती आहे. पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

याशिवाय श्रीकाळाराम मंदिरालाही ई-मेल आल्याची माहिती असल्यामुळे ग्रामीणसह शहर पोलिस अधिक सतर्क झाले आहेत. गेल्या आठवड्यात राज्यातील न्यायालयांना अशाच प्रकारे ई-मेल आले होते. त्यानंतर आता धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्यात आल्यामुळे या प्रकाराकडे गांभीराने पाहिले जात आहे.

भाविकांनी घाबरू नये: पोलिसांचे आवाहन

दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी वाढली आहे. अशा परिस्थितीत धमकीच्या ई-मेलमुळे भाविकांमध्ये भीती निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी शांततेचे आवाहन केले आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये, संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच देवस्थानांकडूनही सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्याबाबत संस्थानांना सतर्क करण्यात आले आहे.

ई-मेलचा स्रोत, तांत्रिक तपशीलाचा शोध

ई-मेल नेमका कोून आला, त्यामागे कोणाचा हात आहे आणि उद्देश काय, याचा तपास सायबर सेलने सुरू केला आहे. ई-मेलचा स्रोत, तांत्रिक तपशील आणि पाठविणाऱ्याची माहिती शोधण्याचे काम सुरू आहे. मेलचा नेमका मजकूर आणि तपसातील महत्त्वाच्या बाबी गोपनीय ठेवण्यात आल्या आहेत. अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या धमकीची दखल वरिष्ठ स्तरावर घेण्यात आली आहे.

५० ते ६० अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त

ई-मेल प्राप्त झाल्यानंतर त्र्यंबकेश्वर मंदिर आणि सप्तशृंगी गड परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. दोन्ही देवस्थानांच्या परिसरात अतिरिक्त ५० ते ६० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मंदिरांच्या प्रवेशদ্বारे, दर्शन रांगा, वाहनतळ आणि परिसरातील संवेदनशील ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. संशयास्पद व्यक्ती आणि हालचालींवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून मंदिर परिसरातील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT