नाशिक : भारत-पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे देशभरात सतर्कता बाळगली जात आहे. त्यानुसार शहरातील संवेदनशील ठिकाणांवरील पोलिस बंदोबस्तात वाढ झाली आहे. तसेच शहर पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. स्थानिक पोलिसांसह केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून लक्ष केंद्रित केले आहे.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. शहरासह जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणांवर व त्यांच्या २ किमी आजूबाजूच्या परिसरात सप्टेंबर २०२२पासून 'नो फ्लाइंग झोन' लागू आहे. शुक्रवारी (दि.९) सायंकाळपर्यंत पोलिस आयुक्तालयासह ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयात संरक्षण व सुरक्षेसंदर्भात आढावा बैठका सुरू होत्या. यापाठोपाठ कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन, आर्टिलरी, तोफखाना व एचएएल या लष्करी यंत्रणांनीदेखील बंदोबस्तात वाढ केली आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक व जिल्ह्याचे अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार शहरासह जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आवश्यकतेनुसार ती वाढवण्यात येत आहे.
जम्मू-काश्मीर, पंजाब, गुजरात, राजस्थानमध्ये काही ठिकाणी 'ब्लॅकआउट' झाल्यानंतर शहरातील प्रमुख लष्करी केंद्रांमध्ये सैन्याने सराव केला. गुरुवारी (दि. ८) मध्यरात्री बारा वाजेपासून शुक्रवारी (दि.९) पहाटे अडीचपर्यंत कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर्स व मिग विमानांच्या सरावामुळे शहरात घिरट्यांचा आवाज ऐकू येत होता. त्यामुळे सोशल मीडियावरही याबाबत पोस्ट येत असल्याने नाशिककरांनी सतर्कता बाळगल्याचे दिसून आले.
कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन, गांधीनगर, देवळाली कॅम्प तोफखाना, देवळाली कॅम्प आर्टिलरी सेंटर, हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड (एचएएल), इंडिया सिक्युरिटी प्रेस, करन्सी नोट प्रेस या ठिकाणी सैन्य दलाचा बंदोबस्त सतर्क झाला आहे. तसेच शहर व ग्रामीण पोलिसांचे सुमारे ६ हजार पोलिसांचा फौजफाटा, इंटेलिजन्स ब्युरो, राज्य गुप्तवार्ता विभाग (एसआयडी), दहशतवादी विरोधी विभाग (एटीएस) यांचाही बंदोबस्त तैनात आहे.
सोशल मीडियावर युद्धासंदर्भात व्हायरल होत असलेल्या पोस्टवर सायबर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. तसेच शासकीय यंत्रणांनीही सोशल मीडियावर खातरजमा न करता कोणत्याही स्वरूपाची पोस्ट, मत किंवा प्रतिक्रीया न देण्याचा सल्ला दिला आहे.