नाशिक | येथे दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मंत्रिपदावरून डावलले गेल्याने नाराज असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यातील 'गुफ्तगू' भुजबळांच्या भाजप प्रवेशाच्या राजकीय चर्चांना बळ देणारी ठरली आहे. मालेगाव येथील अजंग गावी झालेल्या कार्यक्रमात शाह यांनी भुजबळांना आपल्या शेजारील खुर्चीवर बसवत संवाद साधला. इतकेच नव्हे, तर शाह यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच 'भुजबळ हे एनडीएचे महत्त्वाचे नेते आहेत', असे सांगत त्यांचे कौतुक केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
केंद्रीय गृहमंत्री शाह शुक्रवारी (दि. २४) नाशिक दौऱ्यावर होते. मालेगाव येथील माजी सैनिक व शेतकऱ्यांनी अजंग येथे उभारलेल्या ५३८ एकरांतील व्यंकटेश्वरा कृषी फार्मला त्यांनी भेट दिली. शेतकऱ्यांसाठीच्या माती परीक्षण केंद्र व अगरबत्ती कारखान्याचे उद्घाटन शाह यांच्या हस्ते झाले. यावेळी सहकार परिषदेच्या माध्यमातून शाह यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमास भुजबळदेखील उपस्थित होते. शाह या कार्यक्रमाच्या मंचावर दाखल झाल्यावर त्यांनी भुजबळ यांच्याकडे बघितले. त्यानंतर त्यांनी भुजबळ यांना बोलावत आपल्या जवळच्या खुर्चीवर बसवले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ संवाददेखील झाला. शाह- भुजबळ यांच्यातील या 'गुफ्तगू'चा सविस्तर तपशील कळू शकला नाही. मात्र, भुजबळ यांची देहबोली बरेच काही सांगून गेली. शाह यांनी या कार्यक्रमाच्या भाषणाच्या सुरुवातीला भुजबळ यांची स्तुती केली. भुजबळ हे एनडीएचे महत्त्वाचे नेते आहेत, असे शाह यांनी सांगितल्याने सर्वांच्याच नजरा या वक्तव्यावर स्थिरावल्या.
राज्य मंत्रिमंडळातून डावलले गेल्याने भुजबळ कमालीचे नाराज आहेत. नाशिकमधील समता परिषदेच्या मेळाव्यात त्यांनी ओबीसी हक्कांसाठी एल्गार पुकारण्याची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांना अप्रत्यक्ष इशाराही दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत, त्यांची जवळीक वाढत असल्याची चर्चा सुरू झाली होती.
अलीकडेच शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या शिबिराला भुजबळ हजेरी लावून अवघ्या दोन तासांत परतले. यावेळी त्यांनी पुन्हा नाराजीचे संकेत दिल्याने भुजबळ राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चेने जोर धरला. त्यातच केंद्रीय गृहमंत्री शाह आणि भुजबळ यांच्यातील 'गुप्तगू' राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाली आहे.