नाशिक : राज्यपाल बनवण्याचे आमिष दाखवून तामिळनाडूतील व्यावसायिकास सुमारे पाच कोटींना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. पोलिस तपासात व्यावसायिकास फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी संशयिताच्या नावे दिलेले नऊ कोटी रुपयांचे धनादेश वेळीच थांबवल्याने पुढील आर्थिक फसवणूक टळली. दरम्यान, संशयित नीरंजन सुरेश कुलकर्णी याच्या वडिलांसह एका सामाजिक संस्थेची बँक खाती पोलिसांनी गोठविली आहेत.
व्यावसायिक नरसिम्मा रेड्डी दामोदर रेड्डी अपुरी (५६) यांना संशयित नीरंजन कुलकर्णी याने जानेवारीपासून गंडा घातला. शेगाव येथील धार्मिक कार्यक्रमात ओळख झाल्यानंतर नीरंजन याने रेड्डी यांच्याकडून ६० लाख रुपये रोख स्वरूपात, तर चार कोटी ४८ लाख ९९ हजार ८७६ रुपये ऑनलाइन पद्धतीने दिले होते. त्या मोबदल्यात नीरंजनने पेंच व भोर व्याघ्र प्रकल्पालगतची १०० एकर जमीन शासनाकडून भाडेतत्त्वावर घेतल्याची तसेच चांदशी येथील स्वमालकीची जागा असल्याचे सांगत त्याची कागदपत्रे रेड्डी यांना दिली होती. त्यावर विश्वास ठेवून रेड्डी यांनी नऊ कोटी रुपयांचे धनादेश दिले होते. दरम्यान, कागदपत्रांची छाननी केल्यानंतर ती बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर रेड्डी यांनी तातडीने बँकेशी संपर्क साधून धनादेशाचे व्यवहार थांबवले. त्यामुळे त्यांची आर्थिक फसवणूक टळली.
नीरंजनने रेड्डी यांच्याकडून वडील सुरेश कुलकर्णी यांच्या बँक खात्यात व नागपूर येथील वैश्विक सेवा फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या बँक खात्यात पैसे घेतल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी ही दोन्ही बँक खाती गोठवली असून, त्यात कोट्यवधी रुपये असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच पोलिसांनी या संस्थेशी निगडित पदाधिकाऱ्यांकडेही चौकशी सुरू केली आहे. तसेच नीरंजनच्या नागपूर येथील एका डॉक्टर मित्राकडेही पोलिसांनी चौकशी केली असून, त्याच्यावरही पोलिसांना संशय असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नीरंजन याने वडील आणि सामाजिक संस्थेच्या बँक खात्यात पैसे स्वीकारले होते. वडिलांच्या बँक खात्यातील पैसे त्याने काढले नाहीत. तर सामाजिक संस्थेकडे त्याने रोख स्वरूपात पैसे मागितल्यानंतर त्यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे त्याने संस्थेच्या नावे सुमारे दोन कोटी रुपयांची जागा खरेदी केली. त्यामुळे नीरंजन यास पाच कोटी रुपयांमधील एक रुपयाही मिळाला नसल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे.
रेड्डी यांनी नीरंजन यास सांगितले की, माझे मामा हे तीन वेळा आमदार व तीन वेळा खासदार राहिले आहेत. त्यावेळी पैसे मिळाल्यानंतर महिनाभरात मी तुम्हाला राज्यपाल करेन किंवा तुमच्या मामाला राज्यपालपद मिळवून देईल, असे आमिष त्याने रेड्डी यांना दिले होते.