पुढारी ऑनलाइन डेस्क | एक रुपयात पिक विमा योजनेत गैरव्यवहार झाल्याची कबुलीच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. कृषीमंत्र्यांनी सीएसी सेंटरवर या बोगस पीक विम्याचे खापर फोडले आहे.
सीएससी केंद्रांना एका अर्जामागे 40 रुपये मानधन मिळते. त्यापोटीच त्यांनी असे बोगस अर्ज भरल्याचे कृषीमंत्री यांनी स्पष्ट केलं आहे. मानधनासाठी हे उद्योग करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राज्याबाहेरील काही लोकांनी अर्ज दाखल केले आहेत. धार्मिक स्थळे, मोकळ्या जागा शेतजमिन दाखवले गेल्याचे प्रकार समोर आल्याची माहिती त्यांनी दिली.
याप्रकरणी 96 सीएससी सेंटरवर कारवाईचे आदेश दिले असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रसारमाध्यमांना या संदर्भात माहिती दिली.
दरम्यान गैरव्यवहार समोर आल्याने आता ही योजना बंद करण्याबाबत चर्चा आहे त्यावर विचारले असता, गैरव्यवहार झाला म्हणून योजना बंद करायची या विचाराचा मी नाही. योजना बंद न करता योजनेतील त्रुटी दूर करुन त्यात पारदर्शकता आणण्याचा विचार असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले. तसेच योजनेत काही आमुलाग्र बदल केले जातील. युनिक आयडी कार्ड शेतकऱ्यांना दिले जातील. ते आधार कार्डशी लिंक केले जातील. शेतकऱ्यांचा अपडेट डेटा जमा करण्यात येत आहे. राज्यात 4 लाखांहून अधिक पीक विमा अर्ज बाद करण्यात आल्याची माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिली.
दरम्यान, राज्यात बोगस पिक विम्याचा बीड पॅटर्न गाजत असल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला होता. त्यामुळे हा घोटाळा बीड मध्ये झाल्याचे बोलले जात आहे. यावर विचारले असता केवळ बीड मध्येच गैरव्यव्हार नाही. मंत्र्यांनी हे गैरव्यवहार केले असे नाही. धनंजय मुंडेंवर होणारे आरोप राजकीय असल्याचे ते म्हणाले. अनेक अर्ज रद्द केले, त्या खात्यात पैसे वर्ग केलेले नाही. शासनाचा पैसा वाचवल्याचे ते म्हणाले.