नाशिक : सध्या युवकांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत असल्याने जाती, समाज, स्पर्धापरिक्षा, आर्थिक, सामाजिक क्षेत्रात दरी निर्माण झाली असून ही दरी मिटविण्यासाठीच 'युथ इन्फॉर्मेशन अॅण्ड इन्होवेशन सेंटर'ची निर्मिती करण्यात येणार आहे. या युथ केंद्रांद्वारे 10 लाख युवकांना कवेत घेण्यार येणार असल्याचे पदवीधर मतदारसंघाचे आ. सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केले. (A 'Youth Information and Innovation Center' will be created to eradicate unemployment.)
सोमवारी (दि.5) दै. पुढारी कार्यालयास आ. ताबे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी निवासी संपादक मिलिंद सजगुरे आणि युनिट हेड राजेश पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. युवा नेते ज्ञानेश्वर गायकवाड उपस्थित होते. यावेळी आ. तांबे यांनी पुढील 5 वर्षांचा रोडमॅप त्यांनी स्पष्ट केला.
आ. तांबे म्हणाले, बेरोजगारी समुळ नष्ट करण्यासाठी युवकांना एकाच छताखाली उद्योजकता, नोकरी, आरोग्य, शिक्षण याची माहिती मिळणे गरजेचे असून पुढील 5 वर्षात विभागातील पाचही जिल्ह्यात 300 ठिकाणी जय हिंद युथ क्लबची स्थापना करण्यात येणार आहे. या वर्षी 100 युथ क्लबच्या स्थापनेचे उद्दिष्ट असून यावर काम सुरु आहे. याअंतर्गत नाशिकसाठी 5 कोटींचे टेंडर मंजूर झाले असून लवकरच काम सुरु होईल. युथ क्लबद्वारे अभ्यासिका, वाचनालय, फ्री वायफाय, संगणकीकराचा लाभ युवकांना देण्यात येणार आहे. 9 वी पासून पुढील वयोगटाचे 10 लाख युवक याचा लाभ घेतील.
कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी उभारण्यात येणार्या मराठी भाषा केंद्रासाठी 50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून कुसुमाग्रजांच्या निवासस्थानाप्रमणे या भाषा केंद्राची अनुभूती अभ्यागतांना मिळावी यासाठी कुसुमाग्रजांचे स्मारक, मुंबईचे मराठी भाषा भवन या भाषा केंद्राला जोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्याच्या राजकीय व्यवस्थेवर बोलतांना त्यांनी खंत व्यक्त केली, आजचे राजकारणी निवडून आले की मतदारांना विसरतात. जे टॅक्स भरतात त्यांनाच सोईसुविधांसाठी राजकारण्यांच्या पाया पडावे लागते ही शोकांतिका आहे. यासाठी अधिवेशनात विचारण्यात येणारे प्रश्न मी मतदारसंघातील नागरिकांकडून मागवितो. यासाठी 100 दिवस सर्वे केला असून 25 हजार नागरिकांनी मला फीड बॅक दिला. यानंतरच मी अधिवशेनात प्रश्न विचारल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जुन्या पेन्शनच्या संदर्भात राज्य शासन सकारात्मक असून मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकार्यांना पेन्शन योजना लागू करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुंभमेळ्याचे नियोजन सुरू व्हायला हवे. कुंभमेळ्यासाठी समिती स्थापन झाली असली तरी समितीची एकही बैठक अद्यापत झालेली नाही. प्लॅनिंग, फंड्स यावर विचारविनिमय व्हायला हवा. शेवटच्या क्षणी पळापळ करुन काहीच हाती लागणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
जनतेकडून डायरेक्ट टॅक्स घेण्यापेक्षा नॉन टॅक्स रेव्हेन्यू वाढायला हवा. खाणकाम, बॉक्साईट, कोळसा यातून उत्पन्नाची साधने निर्माण करायला हवी. व्यापारी दृष्टीकोनातून सरकारने काम करायला हवे. एकलहरे येथील बाराशे कोटींच्या औष्णिक केंद्राचा विस्तार होण्याची गरज असून यासाठी व्यापारी दृष्टीकोनातून गुंतवणूक आणि योजनेवर काम व्हायला हवे. रोजगार निर्मितीच्या संधी निर्माण करायला हव्यात यावर त्यांनी भर दिला.
उद्याचा समृध्द महाराष्ट्र कसा असावा यावर बोलतांना, आनंदी समाधानी नागरिक हेच राज्यकर्त्यांचे उद्दिष्ट असायला हवे यासाठी हॅप्पीनेस इंडेक्स वाढायला हवा. यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर पायाभुत सुविधांवर ऑपरेशन्स होणे गरजेचे आहे. केवळ आरोग्याच्या प्रश्नांचा विचार केला तर प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर्स नाही याला कारण त्यांना निवासस्थान उपलब्ध नाही. सरकारने यावर काम करावेअशी सुचना त्यांनी केली.
भारतातील एकही विद्यापीठ जगातील पहिल्या 100 मध्ये येत नाही यावर त्यांनी खंत व्यक्त केली. भारतातील आयआयटी, आयएम हे जगाच्या तुलनेत कुठे आहे असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला. शासनाने वकीलांच्या सनदसाठी लागणारी फी 15 हजाराहून साडेसातशे रुपयांवर आणली मात्र इतर कोर्सेसीच फी अद्यापही कमी केली नाही फी घ्या मात्र क्वालिटी एज्युकशेन दया असा सल्ला त्यांनी दिला.
नाशिकमध्ये नवीन उद्योगधंदे येत नाही यासाठी राजकीय उदासिनतेकडे त्यांनी बोट दाखविले. कंपन्या यायल तयार आहे पण नाशिक, सिन्नरमध्ये जागा नाही. टेस्ला यायला तयार होती मात्र राजकीय प्रयत्न होणे गरजेचे होते. उद्योगांना सवलती द्यायला हव्यात मात्र राजकीय उदासिनतेमुळ उद्योग यायला तयार नसल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.