नाशिक : आडगाव ट्रक टर्मिनल येथे चालकांसाठी सारथी सुविधा केंद्र उभारण्यात येणार असून बंद पडलेल्या जकात नाक्यांवर ट्रक टर्मिनल विकसित करून पार्किंगची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. याबाबत नाशिक महापालिका सकारात्मक असून नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्टच्या मागण्या मार्गी लावल्या जातील, असे आश्वासन आयुक्त मनिषा खत्री यांनी दिले.
आयुक्त खत्री यांच्यासोबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक महापालिका मुख्यालयात पार पडली. या बैठकीत आडगाव नाका येथील ट्रक टर्मिनल परिसरात 'सारथी सुविधा केंद्र' उभारण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीदरम्यान नाशिक शहराच्या लगत बंद पडलेल्या जकात नाक्यांचा उपयोग आगामी कुंभमेळ्याच्या काळात मोठ्या वाहनांच्या पार्किंगसाठी करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. कुंभमेळ्यानंतर सदर जागा पुढे नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनला ट्रक पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मनपा प्रशासन सकारात्मक असून, यासाठी आवश्यक नियोजन व कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. यावेळी ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष पी. एम. सैनी, चेअरमन राजेंद्र फड, सल्लागार जयपाल शर्मा, उपाध्यक्ष शंकर धनावडे, सुभाष जांगडा, सेक्रेटरी बजरंग शर्मा आदी उपस्थित होते.
या सुविधा उपलब्ध होणार
आडगाव ट्रक टर्मिनल येथे प्रस्तावित 'सारथी सुविधा केंद्रा'मुळे वाहनचालक व वाहतूकदारांना आवश्यक शासकीय सेवा, मार्गदर्शन, विश्रांती सुविधा तसेच विविध प्रशासकीय कामांसाठी एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामुळे ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतूक व्यवस्थाही अधिक सुव्यवस्थित होण्यास मदत होणार आहे.