सप्तशृंगगड : पुढारी वृत्तसेवा
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडासह त्र्यंबकेश्वर व अन्य देवस्थानांना नुकसान पोहोचविण्याचा धमकीचा ई-मेल प्राप्त झालेला असताना, मंदिर बंद झाल्यानंतर रात्री १० ला भाविकांना प्रवेश दिला जात असल्याचा आरोप होत आहे.
नांदुरीची पोलिस चौकी येथे वाहन तपासणीचा पत्ताच नाही, सप्तशृंगगडावरील डीजे-बॅण्डवरील बंदीला केराची टोपली दाखविली जाते आणि अतिक्रमण हटाव मोहिमेचा दिखावा यात्रेपुरताच होतो, असा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे, सप्तशृंगी देवीचे मंदिर नियमितपणे पहाटे ५ ते रात्री ९ पर्यंत दर्शनासाठी खुले असते. यात्रा व विशेष उत्सव काळातच मंदिर २४ तास खुले ठेवले जाते. असे असताना भाविकांना रात्री १० नंतर मंदिरात प्रवेश दिल्याचा आरोप होत आहे.
सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे उल्लंघन होत असल्याचे कळवण पोलिस निरीक्षकांच्या पत्रातून समोर आले आहे. मंदिर बंद झाल्यानंतरही बाहेरील व्यक्तींना कोणतीही तपासणी न करता सोडले जात असल्याचे पोलिसांनी निदर्शनास आणून दिले आहे.
गडावर येणाऱ्या प्रत्येक वाहनावर नियंत्रण ही सुरक्षेची प्राथमिक अट आहे. नांदुरी आणि धोंड्या कोंड्याची वीर परिसरात वाहन तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र नांदुरीच्या कमानीजवळ पोलिस चौकी आहे. मात्र, बंदोबस्त आणि वाहन तपासणीची व्यवस्था नाही. श्रीक्षेत्राच्या धार्मिक पाकियाचा, भाविकांच्या सोयीचा आणि सुरक्षेचा विचार करून डीजे व बॅण्डला सक्त मनाईचे नियोजन आहे. मात्र, प्रत्यक्षात गडावर डीजे आणि बॅण्ड दाखल झाल्याचे चित्र आहे.
यात्रेपूर्वी हॉटेल आणि विविध व्यावसायिकांच्या अतिक्रमणांवर पोलिस व ग्रामपंचायतीने कारवाई केली. मात्र, यात्रा संपताच अतिक्रमणांचा बाजार पुन्हा भरला आहे. काही ठिकाणी पूर्वीपेक्षाही अधिक अतिक्रमणे कायम असल्याचे निदर्शनास येत आहे.
ट्रस्टचे आदेश कागदावरच ?
सुरक्षाव्यवस्थेतील तक्रारींची दखल घेत श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टने संबंधित सुरक्षा यंत्रणा व कर्मचाऱ्यांना लेखी निर्देश दिले आहेत. मंदिर निर्धारित वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत भाविकांना प्रवेश देऊ नये, येण्या-जाण्याच्या निश्चित मार्गात मनमानी बदल करू नये, वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करावे, असे स्पष्ट केले आहे. निष्काळजी आढळल्यास संबंधित कर्मचारी व विभागप्रमुखांची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे.