सप्तश्रृंगीगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या सप्तशृंगी गडावरील (Saptashrungi Gad ) रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालकांची गैरसोय होत असून वाहन चालवताना अक्षरशः सर्कस करावी लागत आहे.
धोंड्या कोंड्याच्या विहिरीजवळ गावात प्रवेश करताना भाविकांच्या स्वागतासाठी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. अंदाजे एक फुटाचे खड्डे झाले असल्यामुळे त्यात पावसाचे पाणी साठल्याने व रस्त्याला उतार असल्यामुळे दर्शनाला जाताना व परतीचा प्रवास करताना खड्ड्यांमध्ये दुचाकी वाहन आदळून तीन ते चार अपघात झाले आहेत. त्यामुळे भाविकांना मोठी दुखापत सहन करावी लागली.
या रस्त्यांवरील खड्ड्यात पाणी साचल्यामुळे खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे चारचाकी वाहनेही या ठिकाणी आदळून भाविकांच्या वाहनांचे नुकसान होत आहे. या परतीच्या रस्त्याला उतार असल्यामुळे तसेच मोठ्या प्रमाणात दाट धुके असल्याने वाहन चालविताना अवघड परिस्थिती निर्माण होत आहे. या खड्ड्यातून त्या खड्ड्यात त्या खड्ड्यातून या खड्ड्यात असे वाहने चालविताना अक्षरशः वाहन चालकाला सर्कस करावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळे अपघात संख्येत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
या ठिकाणी दोन ते तीन महिन्यापूर्वीच फक्त रस्त्यावर खडी व कच टाकून आपली वेळ मारून धन्यता मानली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे हेतू परस्पर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वारंवार गडावर येत असतात. याच रस्त्यावरून त्यांचे येणे- जाणे असते परंतु ते फक्त बघ्याचीच भूमिका घेत असल्यामुळे नागरिकांनी व भाविकांनी संताप व्यक्त केला आहे. मोठा अपघात घडला तरच सार्वजनिक विभागाला जाग येईल का असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
या रस्त्यांवरील खड्ड्यांचा नेहमीचा त्रास आहे. पावसाळ्यात हा त्रास जास्त सहन करावा लागतो. मोठमोठे खड्डे असल्यामुळे वाहन चालकाला अंदाज येत नसल्याने व पाणी साचल्याने अपघात होत आहे. आठ दिवसात हे खड्डे न बुजविल्यास यामध्ये वृक्षारोपण करणार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहोत.योगेश कदम, सप्तशृंगी गड सामाजिक कार्यकर्ता
सप्तशृंगी गडावर देवी मातेच्या दर्शनासाठी भुसावळ येथुन आलो आहे. घाटात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालवणे धोकादायक बनले आहे. मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने रस्ते चांगले असणे गरजेचे आहे.सुरेश चौधरी भाविक भुसावळ