नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उत्तर महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कळवण तालुक्यातील श्रीक्षेत्र सप्तशृंगगडाच्या विकासाला आता मुदतवाढीचे बळ मिळाले आहे. राज्यातील तीर्थक्षेत्रे आणि पर्यटनस्थळांच्या परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या २२ विकास आराखड्यांना राज्य शासनाने ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
यात जिल्ह्यातील सप्तशृंगदेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचाही समावेश आहे. त्यामुळे गडावरील मंजूर विकासकामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला अधिक वेळ मिळणार असून, या कामांच्या संनियंत्रणाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. राज्याच्या नियोजन विभागाने शुक्रवारी (दि. २०) यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.
यापूर्वी काही विकास आराखड्यांना दि. ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, मुदत संपल्यानंतरही अनेक आराखड्यांमधील मंजूर कामे पूर्ण झालेली नसल्यामुळे शासनाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे धार्मिक पर्यटनाबरोबरच परिसरातील पायाभूत नागरी सुविधांच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न आहे.
कळवण तालुक्यातील वणी येथील सप्तशृंगदेवी मंदिर हे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठांपैकी असून, वर्षभर देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. विशेषतः नवरात्रोत्सव आणि चैत्रोत्सवात गडावर भाविकांची मोठी गर्दी होते. वाढती भाविकसंख्या लक्षात घेता, गडावरील पायाभूत सुविधा, भाविकांसाठी आवश्यक नागरी सोयी आणि परिसराचा नियोजनबद्ध विकास महत्त्वाचा ठरत आहे.
अशा पार्श्वभूमीवर सप्तशृंगगड विकास आराखड्याला मिळालेली मुदतवाढ महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या आराखड्याच्या अंमलबजावणीवर नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांची संनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आराखड्यांतर्गत मंजूर कामांचा आढावा घेणे, त्यांची पूर्तता निश्चित करणे आणि मुदतीत कामे पूर्ण करून घेण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर राहणार आहे.
विशेष म्हणजे, मुदतवाढ देताना शासनाने कामे पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित संनियंत्रण अधिकाऱ्यांवर स्पष्टपणे निश्चित केली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयातून महाराष्ट्रातील धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्गपर्यटनस्थळांच्या विकासालाही मुदतवाढ मिळाली आहे. यात पंढरपूर, देहू - आळंदी, भंडारा डोंगर, पालखीतळ, जेजुरीगड, गणपतीपुळे,
भीमाशंकर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, शेगाव परिसरातील संत गाडगेबाबा समाधिस्थळ, मोझरी, सेवाग्राम, ताजबाग या तीर्थक्षेत्रांचा विकास या निर्णयाच्या कक्षेत आला आहे. याशिवाय सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक व निसर्ग पर्यटनस्थळांच्या एकात्मिक विकास आराखड्याचाही समावेश आहे.