नाशिक

Sant Nivruttinath Palkhi Trimbak : संत निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण

Nashik Trimbakeshwar News मंगळवारी होणार प्रस्थान; ५३ दिंड्यांचा सहभाग

पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर (नाशिक) : शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या संत निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्याचा प्रस्थान सोहळा मंगळवार (दि. १०) मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. हजारो वारकरी भक्तांच्या उपस्थितीत संत निवृत्तिनाथ महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने आपली यात्रा सुरू करणार आहे. त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानच्या वतीने सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. सोमनाथ घोटेकर, सचिव श्रीपाद कुलकर्णी आणि पालखी सोहळाप्रमुख गोकुळ महाराज गांगुर्डे यांनी विश्वस्त सदस्यांसह त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर या पालखी मार्गावरील विविध मुक्काम स्थळांना भेट देत निवाराव्यवस्थेची पाहणी केली. काही ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

वॉटरप्रूफ मंडपांची गरज

यावर्षी पावसाचा अंदाज निश्चित न राहिल्याने मुक्काम स्थळी वॉटरप्रूफ मंडपांची आवश्यकता भासणार आहे. पूर्वी पावसाची सुरुवात पालखी निघाल्यानंतर होत असे, मात्र आता पावसाचा काही नेम नाही. मुसळधार पावसामुळे वारकऱ्यांना रात्रभर जागून काढावी लागते, त्यामुळे निवाऱ्याच्या सुविधा वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

शिस्तबद्धतेसाठी सेवेकरी ओळखपत्र योजना

पालखी प्रस्थानाच्या वेळी फोटो काढण्यासाठी होणारी गर्दी आणि त्यामुळे होणारा उशीर टाळण्यासाठी या वर्षी संस्थानने सहा वारकरी सेवेकऱ्यांना अधिकृत ओळखपत्र दिली आहेत. हे सेवेकरी पारंपरिक पोशाखात राहून पालखी उचलणे, रस्ता मोकळा करणे आणि शिस्त राखणे यासाठी मदत करतील. आळंदी वारीच्या धर्तीवर पालखी सोहळ्यात शिस्त व सुसूत्रता आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Nashik Latest News

हरित वारी उपक्रम

'हरित वारी' उपक्रमांतर्गत प्रत्येक मुक्कामस्थळी आणि दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी पाच झाडांची रोपे ग्रामपंचायतींना देण्यात येणार आहेत. या वृक्षांची लागवड व देखभाल ग्रामपंचायती करणार असून, वनविभाग आणि वैयक्तिक देणगीदारांच्या सहकार्याने एक लाख रोपांची तजवीज करण्यात आली आहे.

वैद्यकीय, स्वच्छता सुविधा वाढवणार

पालखी सोहळ्याच्या मार्गात अनेक वेळा वारकऱ्यांची प्रकृती अचानक बिघडते. यंदा जास्त रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथकांची व्यवस्था करण्यात आली आहे. ५३ अधिकृत दिंड्या आणि हजारो स्वतंत्र वारकरी या यात्रेत सहभागी होणार असल्याने पाणीपुरवठा, वैद्यकीय सुविधा, मोबाइल टॉयलेट्स व स्वच्छतेचे नियोजन अधिक व्यापक करण्यात आले आहे.

प्रशासनाशी समन्वय

संत निवृत्तिनाथ पालखी सोहळा नाशिक, सोलापूर आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांतून जातो. या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित प्रशासनाशी संस्थानने समन्वय साधलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाने रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निर्देश दिले आहेत. मुक्कामानंतर स्वच्छता राखण्यासाठी ग्रामपंचायतींना सूचना दिल्या आहेत.

निधी वाटपाची प्रतीक्षा

गतवर्षीप्रमाणे यंदाही प्रत्येक मुक्काम व दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी ३ लाख रुपये निधी देण्यात येणार आहे. यंदा अद्याप निधी प्राप्त न झाल्याचे सांगण्यात आले, मात्र तयारी सुरू ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. पालखी मार्गावरील सुमारे ५५ ग्रामपंचायतींना लवकरच ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून निधी वर्ग होण्याची अपेक्षा आहे.

पालखी प्रस्थानाची सर्व सज्जता झाली आहे. निर्मल वारी, हरित वारी करण्यासाठी या वर्षी विशेष भर देण्यात आला आहे. सर्वांच्या सहकार्याने वारी आनंददायी व कृतार्थ करणारी ठरावी.
ॲड सोमनाथ घोटेकर, अध्यक्ष. संत निवृत्तिनाथ समाधी मंदिर संस्थान, त्र्यंबकेश्वर, नाशिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT