त्र्यंबकेश्वर (नाशिक) : येथे संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची उटीची वारी गुरुवारी (दि. २४) चैत्र वद्य एकादशी वरुथिनी रोजी होत असल्याने त्यासाठी संस्थानाकडून तयारी सुरू झाली आहे.
श्री संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या संजीवन समाधीस चंदनाचा लेप लावला जातो. यानिमित्त परंपरेनुसार शुक्रवारी (दि. १८) मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला आहे.
संस्थानाकडून उटी तयार करण्यासाठी चंदन उगाळण्यास प्रारंभ झाला. मंदिराच्या बाजूला असलेल्या सभामंडपात वारकरी भक्त चंदन उगाळून सेवा करत आहेत. पुढील सात दिवस चंदन उगाळले जाणार आहे. जवळपास ५० किलो चंदनाचे खोड येथे घासून लेप तयार करण्यात येत आहे. हा लेप म्हणजेच उटी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीला चैत्र वद्य एकादशीच्या दिवशी दुपारी २ च्या सुमारास भजन- कीर्तनाच्या गजरात लेपन केले जाणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी मध्यरात्री विधिवत पूजनाने उटी उतरवण्यात येणार आहे.
अखंड हरिनाम सप्ताहात दररोज भाविकांकडून चंदन उगाळण्याचे काम केले जाते. सायंकाळी प्रसादाची पंगत असते. येथे आलेले वारकरी, भाविक महिला ओव्या म्हणत चंदन उगाळत असतात. त्यानंतर उगाळलेले चंदन वस्त्रगाळ केले जाते. त्यामध्ये अत्तर टाकले जाते. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांनी संजीवन समाधी घेतली आहे. वैशाख वणवा सुसह्य व्हावा म्हणून त्यांच्या समाधीस शीतल चंदनाची उटी लावली जाते.जयंत महाराज गोसावी, पुजारी,