खासदर संजय राऊत file photo
नाशिक

मुख्यमंत्री यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांचा जोरदार पलटवार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सकाळी उठून भोंगे वाजवणाऱ्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत बांबू लावायला पाहिजे, असे वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी शिवराळ भाषेत पलटवार केला आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही सगळ्यांनी मिळून महायुतीला बांबू लावला. विधानसभा निवडणुकीत हा बांबू आरपार जाईल. आता त्यांना स्वप्नातही बांबूच दिसतो. गद्दारांना लोक रस्त्यावर बांबूचे फटके मारतील, अशी जळजळीत टीका खा. राऊत यांनी केली आहे.

  • नाशिक दौऱ्यावर आलेल्या संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

  • मुख्यमंत्र्यांना बांबू घालायचा असेल तर तो आम्ही विधानसभेत घालू, असेही संजय राऊत म्हणाले.

  • पाठिंबा देणारे, पाठबळ देणारे पोलिस, प्रशासन, आमदार आणि खासदार हे कोणत्या पक्षाचे आहेत हे सर्व समोर आले आहे, अशी टीका देखील राऊत यांनी यावेळी केली.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. राऊत म्हणाले की, सध्याचे मुख्यमंत्री घटनाबाह्य, बेकायदेशीर आहेत. तरीही हे सरकार निर्लज्जपणे मोदी आणि शहांनी महाराष्ट्राच्या बोकांडी बसवले आहे. महायुतीच्या आमदारांना भरघोस निधी देण्यापेक्षा कांदा उत्पादक, दूध उत्पादक शेतकऱ्यांना पैसे द्या. तेलंगणात सरकारने पु्न्हा एकदा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. महायुतीच्या नेत्यांना टक्केवारीत पैसे देण्यापेक्षा दूध उत्पादक आणि कांदा उत्पादक यांना निधी दिला पाहिजे. महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या सुरू आहेत. याबद्दल मुख्यमंत्र्यांना बांबू घालायचा असेल तर तो आम्ही विधानसभेत घालू, असेही राऊत म्हणाले.

पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरही राऊत यांनी भाष्य केले. ड्रग्जच्या पैशांतून सध्याच्या सरकारचे खिसे भरले जात आहेत. आम्ही वारंवार फक्त आरोप नाही केले तर त्याचे पुरावेही दिले आहेत. यांना पाठिंबा देणारे, पाठबळ देणारे पोलिस, प्रशासन, आमदार आणि खासदार हे कोणत्या पक्षाचे आहेत हे सर्व समोर आले आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

विरोधी पक्ष काय असतो ते कळेल!

संसदेच्या अधिवेशनच्या पहिल्या दिवशी (सोमवारी) इंडिया आघाडीच्या २४० खासदारांनी संविधानाची प्रत घेऊन संसदेत प्रवेश केला. याबद्दल राऊत म्हणाले की, काँग्रेसचे १०० हून अधिक खासदार, आम्ही सगळे मिळून २४० खासदार आहोत. हे सगळे मिळून २४० चे २७५ खासदार कधी होतील, हे मोदी- शाह यांना कळणारही नाही. गेल्या १० वर्षांत विरोधी पक्षाला चिरडण्याच्या प्रयत्न केला. तो विरोधी पक्ष प्रचंड ताकद घेऊन संसदेत जात आहे. मोदी- शाह यांच्या समोर १० वर्षांत प्रथमच विरोधी पक्ष असेल आणि तो त्यांच्यासमोर पहिल्या बाकावर बसलेला असेल. आता मोदी- शाह यांच्या ईस्ट इंडिया कंपनीला कळेल की, विरोधी पक्ष काय असतो, असा गर्भीत इशारादेखील राऊत यांनी दिला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT