नाशिक : 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावेळी शिवसेना- भाजपची युती तुटू नये, असे देवेंद्र फडणवीस यांचे मत होते. तेव्हा युतीसाठी फडणवीस यांची भूमिका सकारात्मक होती. पण भाजपचा वरून जो कार्यक्रम आला, त्यानुसार युती तुटली, असा गौप्यस्फोट करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांची बाजू घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
फडणवीस यांचे कौतुक करतानाच, आज तुमच्याकडे सत्ता आहे, पण बहुमत फार चंचल असते, कधी इकडे- तिकडे सरकेल सांगता येत नाही. मग तुम्हाला कळेल आपण काय चुका केल्या होत्या, असा टोलाही राऊतांनी फडणवीस यांना लगावला.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या खा. राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, २०१४ मध्ये विधानसभेच्या जागावाटपावरून शिवसेना- भाजप नेत्यांमध्ये बराच खल झाला होता. एकेका जागेवर ७२ तास चर्चा झाली. मी त्यामध्ये होतो. ओमप्रकाश माथुर भाजपचे प्रभारी होते. आम्ही त्यांचा सगळा खेळ पाहात होतो. पण मी एक नक्की सांगेन की, देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही परिस्थितीत युती तुटू नये, या मताचे होते. हे मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो. तेव्हा युतीसंदर्भात त्यांची भूमिका सकारात्मक होती, मात्र, भाजपचे ज्येष्ठ नेते युती तोडण्यासाठी दिल्लीतून त्यांचा कार्यक्रम घेऊन आले होते. युती तोडायची ठरले होते. फक्त चर्चेचे नाटक करून युती तोडण्यात आली. शिवसेनेला आपण संपवावे हे त्यांचे धोरण होते असा आरोपही राऊत यांनी केला.
लोकसभेला उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात अशा हिंदी भाषिक पट्ट्यात ६० ते ६५ जागा लढायचे आमचे ठरले होते. आम्ही हे ज्यावेळी जाहीर केले, तेव्हा भाजपचे धाबे दणाणले, असे राऊत म्हणाले.
मोठ्या दंगली घडवणारे मास्टरमाइंड नेहमी सरकारमध्येच असतात. आताही नागपूर दंगलीसाठी चिथावणी देणारा फहीम खान याच्यावर कारवाई झाली आहे. पण या दंगलीची ठिणगी टाकणारे तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. आज तुमच्याकडे सत्ता आहे, पण बहुमत फार चंचल असते, कधी इकडे- तिकडे सरकेल सांगता येत नाही. मग तुम्हाला कळेल आपण काय चुका केल्या होत्या. विरोधकांवर नुसता चिखल उडवणे याला राज्य करणे म्हणत नाही, अशी टीकाही राऊत यांनी केली.