Sanjay Raut, Devendra Fadnavis File
नाशिक

Sanjay Raut | भ्रष्टाचार समोर आणत असतील तर फडणवीसांचे स्वागतच !

संजय राऊतांकडून पुन्हा मुख्यमंत्र्यांचे कौतुक

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात जी कामे झाली तो केवळ भ्रष्टाचारच होता, असा गंभीर आरोप करत आरोग्य खात्यातील भ्रष्टाचार विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थांबवत असतील आणि आधीचा भ्रष्टाचार कसा झाला हे जनतेसमोर आणणार असतील तर त्यांच्या प्रत्येक कृतीचे आम्ही नक्की स्वागतच करू, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक केले आहे.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या खा. राऊत यांनी शनिवारी(दि.१) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात आरोग्य विभागाने मंजूर केलेल्या 3 हजार 200 कोटींच्या कामांना विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थगिती देत या कामांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात खा. राऊत यांना विचारले असता, राऊत यांनी शिंदे यांच्या कारभारावर निशाणा साधला. राऊत म्हणाले की, शिंदेंच्या काळात आरोग्य मंत्री कोण होते हे साऱ्यांना माहिती आहे. आणि त्यांच्या अल्प कार्यकाळात किती घोटाळे झाले हेही सर्वांना ठाऊक आहेत. म्हणूनच भाजपकडून अशा भ्रष्ट मंत्र्यांना विरोध होता. सार्वजनिक आरोग्य खात्याचा थेट जनतेशी संपर्क येतो. मात्र त्या खात्यात भ्रष्टाचार होणार असेल तर ते कसले खाते आणि कसले राजकारण, असे म्हणत फडणवीस हे सर्व थांबवत आहेत आणि पुढे ही थांबवणार असतील, आधीचा भ्रष्टाचार कसा झाला हे जर जनतेसमोर आणणार असतील तर नक्की आम्ही त्यांचे स्वागत करू, असे राऊत यांनी सांगितले.

कोकाटेंना वाचविण्याचा प्रयत्न

माणिकराव कोकाटे हे कायद्याने अपात्र ठरलेले आहेत. सध्या मंत्रीपद वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. नियम आणि कायदा पाहिला तर 24 तासात सुनील केदार यांची आमदारकी गेलीय. उत्तर प्रदेशच्या विधानसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचेही तेच झालं. मात्र माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणात स्वतःचा बचाव करण्यासाठी संधी दिली जाते, त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप राऊत यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT