Nashik Municipal Pudhari News Network
नाशिक

Nashik Municipal corporation news | संगीता नांदूरकर पुन्हा उपायुक्तपदी रुजू

नांदूरकर यांना सुधारित आकृतीबंध मंजुरीच्या अपेक्षेवर उपायुक्तपदाच्या सहाव्या अतिरिक्त पदावर नियुक्त करण्यात आले होते

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : महापालिका सेवेतून तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आलेल्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त संगीता नांदूरकर यांना आश्चर्यकारकरित्या पुन्हा एकदा महापालिका सेवेत रुजू करून घेण्यात आले आहे. शासनाच्या आदेशाने नांदूरकर यांना रुजू करून घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, नांदूरकर यांना अतिक्रमण विभागाचा कार्यभार न देता त्यांच्याकडे कामगार कल्याण, सुरक्षा या कमी महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सप्टेंबर २०२५ मध्ये संगीता नांदूरकर यांची अहिल्यानगर महापालिकेतून नाशिक मनपाच्या उपायुक्तपदी नियुक्ती झाली होती. उपायुक्त सुवर्णा दखणे या मातृत्व रजेवर गेल्याने त्यांच्याकडील अतिक्रमण निर्मूलन विभाग तसेच माहिती व तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी नांदूरकर यांच्याकडे सोपविण्यात आली होती.

दरम्यान, अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कारभाराविषयी आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे गंभीर स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावरून २७ फेब्रुवारी रोजी नांदूरकर यांच्याकडील अतिक्रमण विभागाची जबाबदारी काढून घेत त्यांना तडकाफडकी मनपा सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले होते. अतिक्रमण विभागाचा कार्यभार उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

महापालिकेत उपायुक्तांची पाचही पद भरलेली असताना नांदूरकर यांना सुधारित आकृतीबंध मंजुरीच्या अपेक्षेवर उपायुक्तपदाच्या सहाव्या अतिरिक्त पदावर नियुक्त करण्यात आले होते. परंतु आकृतीबंध सहा महिन्यात मंजूर न झाल्याने नांदूरकर यांना कार्यमुक्त करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. गुरुवारी (दि. १२) अतिरिक्त ठरलेल्या नांदूरकर यांना पुन्हा सेवेत घेण्याबाबतचे शासन आदेश महापालिकेत धडकले. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी नांदूरकर यांना पुन्हा सेवेत सामावून घेतले असून कामगार कल्याण व सुरक्षा या दुय्यम दर्जाचा पदभार त्यांच्याकडे देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT