नाशिक (पुढारी वृत्तसेवा): आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील साधुग्रामसाठी आरक्षित असलेली, मात्र अद्याप संपादित न झालेली १९१.२१ एकर जमीन कायमस्वरूपी संपादित करण्याच्या प्रक्रियेला महापालिकेने गती दिली आहे. या भूसंपादनाबाबत महापालिकेने हरकती व सूचना मागवल्यानंतर मुदतीत ३० शेतकऱ्यांनी हरकती नोंदवत जमिनीच्या मालकीसीह विविध हक्कांसंबंधी कागदपत्रे सादर केली आहेत.
आता भूसंपादनाचे दर निश्चित झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना वाटाघाटीसाठी बोलावण्यात येणार असून, त्यानंतर पुढील संपादन प्रक्रिया राबवली जाणार आहे. सन २०२७ मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची पहिली पर्वणी अवघ्या दहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे नाशिक महापालिका आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ प्राधिकरणाने तपोवनातील साधुग्राम उभारणीच्या कामाला वेग दिला आहे.
प्रयागराजच्या धर्तीवर यंदा नाशिकमध्ये साधू-महंत, आखाडे आणि खालसांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन साधुग्रामच्या पायाभूत सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी आरक्षित ३३७ एकर जमिनीच्या संपादनासोबत सुमारे १ हजार ३८० एकर क्षेत्रावर अतिरिक्त साधुग्राम उभारण्याचे नियोजन आहे. अतिरिक्त क्षेत्र भाडेतत्त्वावर घेण्याच्या निर्णयाला काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
साधुग्रामसाठी आरक्षित असलेल्या १९१.२१ एकर जमिनीच्या भूसंपादनासाठी दोन हजार २६७ कोटी रुपये आणि प्रशासकीय खर्चास ५ जून रोजी मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भूसंपादनाची प्रक्रिया होणार असली, तरी त्यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही महापालिकेकडून केली जात आहे.
निधीला मंजुरी मिळूनही भूसंपादनाचे दर अद्याप निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे संपादन प्रक्रियेतील महत्त्वाचा अडथळा कायम आहे. दरम्यान, विकास आराखड्यात साधुग्रामसाठी आरक्षित असलेला आणि अद्याप संपादित न झालेला १९१.२१ एकर जमिनीच्या कायमस्वरूपी संपादनाची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. यासंदर्भात गेल्या महिन्यात जाहीर नोटीस प्रसिद्ध करून संबंधित जमिनीच्या मालकी, भोगवटा, गहाण, भाडेपट्टा, वारसा हक्क अथवा न्यायालयीन वादाबाबत हरकती मागवण्यात आल्या होत्या.
नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रेंसह लेखी हरकती सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार ३० शेतकऱ्यांनी महापालिकेकडे हरकती व सूचना दाखल केल्या आहेत.
या हरकती आणि सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे. भूसंपादनाचे दर निश्चित झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांशी वाटाघाटी करून संपादनाचा मार्ग मोकळा करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
तपोवनात साधुग्रामसाठी २८०.४६ एकर, तर संलग्न सुविधांसाठी ९७.०५ एकर असे एकूण सुमारे ३७७ एकर क्षेत्र आरक्षित आहे. पैकी १४.०७ एकर जमीन महापालिकेने ताब्यात घेतली असून, सुमारे २८३ एकर क्षेत्राचे संपादन बाकी आहे. यातील १३ एकर क्षेत्रात जनार्दन स्वामी मठ आणि लक्ष्मीनारायण मंदिराची लक्ष्मी गोशाळा आहे. तसेच १.५ एकर क्षेत्रात अभिन्यास मंजूर आहे. मठ आणि मंदिरांच्या अस्तित्वात असलेली बांधkामे लक्षात घेता सुमारे २६८ एकर क्षेत्र संपादनासाठी उपलब्ध असून, पैकी १९१.२१ एकर जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आली आहे.