रूपाली चाकणकर File Photo
नाशिक

Ashok Kharat case | खरातसोबत केलेले पूजाविधी कोणते होते? रूपाली चाकणकर यांच्यावर एसआयटीकडून प्रश्नांची सरबत्ती

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची रविवारी विशेष तपास पथकाने (एसआयटी) तब्बल सहा तास चौकशी केली. खरातशी संबंधित असलेल्या संस्थांमध्ये सहभाग व महिला आयोग अध्यक्षपदी असताना खरातशी संबंधित तक्रारींमध्ये पोलिस तपासात केलेला हस्तक्षेप यासंदर्भात त्यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रामुख्याने खरातसोबत केलेले पूजाविधी नेमके कोणत्या स्वरूपाचे होते यासह अन्य प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून एसआयटीने जाणून घेतली.

खरातसोबत तुमचा संपर्क नेमका केव्हा आला, खरातसोबत केलेले पूजा-विधी नेमके कोणते होते आणि त्यामागे काही आर्थिक व्यवहार दडले होते का, शिवनिका संस्थेच्या बैठकींमध्ये नेमके काय कामकाज चालायचे, त्यावेळेस खरातच्या गैरप्रकारांची तुम्हाला माहिती होती का, खरातच्या मंदिरात येणारे इतर राजकीय नेते कोणाच्या सांगण्यावरून येत होते, खरातसोबतचे फोटो आणि व्हिडीओ नेमके कोणत्या कार्यक्रमातील आणि कधीचे आहेत, अशा प्रश्नांची सरबत्ती रूपाली चाकणकरांवर करण्यात आली.

दुपारी साडेबारा ते सायंकाळी साडेसहापर्यंत महाराष्ट्र पोलिस अकादमीतील एसआयटी कार्यालयात ही चौकशी पार पडली. एसआयटी प्रमुख आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते व उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत पथकाने चाकणकर यांना विविध प्रश्न विचारले. यावेळी चाकणकर यांच्यासोबत त्यांचे वकील उपस्थित होते.

रूपाली चाकणकर रविवारी सकाळी पुण्याहून नाशिककडे रवाना झाल्या. यावेळी त्यांनी वाटेत तीन ते चारवेळा वाहन थांबविल्याची तसेच गाडी बदलल्याची माहिती समोर आली. नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दिवंगत रवींद्र पवार यांच्या बडदेनगर येथील निवासस्थानी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना, तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करणार असल्याचेे त्यांनी सांगितले. त्या दुपारी महाराष्ट्र पोलिस अकादमीत दाखल झाल्या.

पुढील आठवड्यात दोषारोपपत्र

अशोक खरात विरोधातील महिला अत्याचार व फसवणुकीच्या एकूण नऊ गुन्ह्यांमध्ये एसआयटीकडून पुढील आठवड्यात दोषारोपपत्र दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशोक खरातला सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून फरार असलेल्या कल्पना खरातचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध पथके कार्यरत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT