चांदवड : सुनील थोरे
धर्म म्हणजे कर्मकांड नव्हे तर, आचरण असल्याचे सांगतानाच आजच्या अनेक समस्यांचे मूळ धर्माचरणाच्या अभावात असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
चांदवड तालुक्यातील मालसाणे येथील णमोकार तीर्थावर सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक महोत्सवाला भागवत यांनी मंगळवारी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. आचार्य कुंथुसागरजी महाराज, आचार्य देवनंदीजी महाराज, आ. डॉ. राहुल आहेर, अध्यक्ष संतोष पेंढारी, नीलम अजमेरा, भूषण कासलीवाल, पारस लोहाडे, वर्धमान पांडे, चंद्रशेखर कासलीवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
मोहन भागवत म्हणाले, धर्माचे आचरण सुटल्यामुळेच आज देशात व राज्यात समस्या वाढताना दिसत आहेत. भारताला हजारो वर्षांची महापुरुषांची परंपरा लाभली असून, श्रमणधारा, ब्राह्मणधारा यांसारख्या विविध विचारप्रवाहांनी भारतीय संस्कृती घडवली आहे, असे त्यांनी नमूद केले. जगभरात विविधता असली, तरी सर्वाधिक विविधता भारतवर्षात असूनही भारत एक राष्ट्र म्हणून अखंडपणे चालतो, हीच भारताची खरी ओळख असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
'विविधतेत एकता' हे केवळ घोषवाक्य नसून जगाला भारताने दिलेला अद्वितीय संदेश असल्याचेही त्यांनी सांगितले. अनुशासन आणि अपरिग्रह या मूल्यांवर भर देताना ते म्हणाले, आधुनिक शास्त्र सांगते की, मानवाच्या इच्छा अमर्याद आहेत. इच्छांवर नियंत्रण ठेवणे म्हणजेच अपरिग्रह, आणि तेच खरे अनुशासन आहे.
हजारो वर्षांपूर्वीचा भारत आजही टिकून आहे, कारण त्याच काळातील तत्वज्ञान व आचरण आजही समाजात जिवंत आहे, असे त्यांनी नमूद केले. आज सुविधा भरपूर आहेत; मात्र सुख हरवत चालले आहे, अशी खंत व्यक्त करतानाच सृष्टी नष्ट होण्याची वेळ आली आहे असे म्हणण्याची वेळ येणार नाही, अशी व्यवस्था आपण निर्माण केली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सृष्टीच्या कल्याणासाठी उभारली जाणारी तीर्थक्षेत्रे ही केवळ श्रद्धेची नव्हे, तर समस्या निराकरणाची केंद्रे असल्याचे सांगत, आचार्य कुंथुसागरजी महाराज, देवकीनंदन महाराज यांसारखे संत अशा तीर्थक्षेत्रांना ऊर्जा देत असल्याचेही सरसंघचालकांनी नमूद केले.
णमोकार मंत्र जगण्याचे शास्त्र : मनुष्य जीवन सुखाने चालावे यासाठी त्रिसूत्री सांगितली जाते; मात्र ती वारंवार सांगावी लागते, ही आजची शोकांतिका असल्याचे त्यांनी नमूद केले. णमोकार मंत्र हा केवळ जपासाठी नसून जीवन जगण्याचे शास्त्र आहे, असे सांगत या मंत्रामुळे मनुष्य जीवन सुखी होईल आणि सृष्टी निरामय बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अहिंसा हाच आपल्या संस्कृतीचा मूलमंत्र
साधू-संत व महंत आजही देशभर भ्रमण करतात. मंदिरे आणि पंचकल्याणक महोत्सव ही कालची संकल्पना नसून शतकानुशतके चालत आलेली परंपरा आहे, असे सांगत 'दुसऱ्याला वेदना देऊ नका, हिंसा करू नका. हाच आपल्या संस्कृतीचा मूलमंत्र आहे,' असे त्यांनी अधोरेखित केले.