देवळाली कॅम्प (नाशिक) : उत्तर महाराष्ट्रातले महत्त्वाचे रेल्वे स्टेशन असणाऱ्या मध्य रेल्वेच्या नाशिक रोड, देवळाली कॅम्प स्टेशनवर सध्या आरपीएफने खडा पहारा द्यायला सुरुवात केली आहे.
भारत-पाक यांच्यातील तणावामुळे आरपीएफचे 65 कर्मचारी आणि १५ रिझर्व्ह फोर्स यांच्या माध्यमातून चारही प्लॅटफॉर्मवर कडक बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सीमेवरील संघर्षामुळे नाशिक रोडसह देवळाली रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट म्हणून सुरक्षाव्यवस्थेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.
युद्धजन्य परिस्थितीत रेल्वे ही स्थलांतरासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. शिवाय ज्या ठिकाणी हजारो लोकांची ये-जा सुरू असते, अशा ठिकाणी अनुचित प्रकार घडू शकतो. याच पार्श्वभूमीवर आरपीएफच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सध्या नाशिक रोड रेल्वेस्थानकावर बंदोबस्तात वाढ केली आहे. देवळाली रेल्वेस्थानकालगत असणाऱ्या लष्कराच्या महत्त्वाच्या आस्थापना लक्षात घेता येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या बॅगा या आधीही तपासल्या जायच्या. मात्र, सध्या त्या अतिशय सूक्ष्म पातळीवर तपासल्या जात आहेत.
रेल्वेस्थानकावर सध्या हाय अलर्ट असून, आम्ही सुरक्षाव्यवस्थेकडे चोख लक्ष देत आहोत. चारही फलाटांवर सुरक्षाव्यवस्था तैनात असून, आमचे 65 अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. आमच्या सर्वांसाठी देशसेवा महत्त्वाची आहे.नवीन प्रताप सिंह, पोलिस निरीक्षक, आरपीएफ नाशिक रोड रेल्वेस्थानक
फलाट क्रमांक एक येथील प्रवेशद्वारासह इतर ठिकाणी सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्यात आली असून, फलाट चारच्या प्रवेशद्वारावरही सुरक्षाव्यवस्था अलर्ट मोडवर आहे. स्थानकावरील प्रत्येक प्रवाशाची तपासणी करण्यात येत आहे. सध्या अनेक प्रवासी दिल्लीकडे जाणाऱ्या गाड्यांचे तिकीट रद्द करायला येत आहे. शिवाय अनेक जवान दिल्लीकडे रवाना होत आहेत. लष्कर हद्दीजवळ असणारे देवळाली कॅम्प रेल्वेस्थानक, इगतपुरी, ओढा, निफाड या ठिकाणीही चौक बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.