नाशिक : आरपीएफ कॉन्स्टेबल भरती परीक्षेत तोतयेगिरी करत लेखी परीक्षेसाठी डमी उमेदवार पाठवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवापुत्र श्रीअजयकुमार (२०, रा. गुहाना, जि. सोनिपत, हरियाणा) व त्याचा साथीदार यांनी बुधवारी (दि. २६) आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीसाठी अनोळखी व्यक्तीला लेखी परीक्षेसाठी हजर केले. त्याच्याकडून परीक्षा पास करून घेऊन आरोपी स्वतः चाचणी परीक्षेसाठी सामनगाव येथे आरपीएफ ट्रेनिंग सेंटर येथे हजर झाला.
परीक्षेच्या रजिस्ट्रेशननुसार उमेदवाराने अनोळखी व्यक्तीला आपल्या जागी लेखी परीक्षा देण्यासाठी पाठवून शासनाची फसवणूक केली. या प्रकरणी जबलपूर येथील सुरक्षा बलाचे पोलिस उपनिरीक्षक सौरभपुत्र ताराचंद माहोर यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक अजित शिंदे तपास करीत आहेत.