Nashik Onion Merchant Fraud 
नाशिक

NAFED NCCF Onion Procurement | 'नाफेड', 'एनसीसीएफ'ने खरेदी केलेला कांदा सडला; खरेदी प्रक्रियेवर पुन्हा संशय

NAFED NCCF Onion Procurement | चांदवड तालुका दक्षता समितीच्या पाहणीत प्रकार उघड

पुढारी वृत्तसेवा

चांदवड : पुढारी वृत्तसेवा
'नाफेड', 'एनसीसीएफ'च्या माध्यमातून जुलैमध्ये खरेदी करण्यात आलेला कांदा साठवणूक केलेल्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात सडलेल्या अवस्थेत आढळला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चांदवड तालुका दक्षता समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार अनिल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निबंधक प्रेरणा शिवदास, तालुका कृषी अधिकारी नीलेश मालये व पुरवठा अधिकारी सूर्यवंशी यांच्या पथकाने गणूर रोडलगतच्या संबंधित गोडाऊनची पाहणी केली असता हा प्रकार समोर आला.

पाहणीदरम्यान संबंधित खरेदीदार व संस्थांच्या प्रतिनिधींनी कांदा खरेदीबाबत आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून न दिल्याने दक्षता समितीने याबाबत स्वतंत्र नोंद केली आहे. जिल्ह्यात 'नाफेड' व 'एनसीसीएफ'ने नियुक्त केलेल्या खासगी संस्थांमार्फत कांदा खरेदी केली जात आहे.

या खरेदी प्रक्रियेत अनियमितता व गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक तालुक्यात दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांना कांदा खरेदीची नियमित पाहणी करून त्याचा अहवाल जिल्हा निबंधक व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यावेळी संबंधित संस्थांनी पोर्टलवर किती शेतकऱ्यांची नोंदणी केली, त्यापैकी किती शेतकऱ्यांनी कांदा विक्री केली, वजन पावती देण्यात आली का, ती पोर्टलवर दिसते का आदींबाबत माहिती मागवण्यात आली. मात्र दक्षता समितीच्या म्हणण्यानुसार, कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे समितीने याबाबत स्वतंत्र नोंद केली.

गोडाऊनमधील कांद्याची पथकाकडून पाहणी

दक्षता समितीच्या अधिकाऱ्यांनी गोडाऊनमधील कांद्याची पाहणी केली असता परिसरात दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आले. सहाय्यक निबंधक, तालुका कृषी अधिकारी व पुरवठा अधिकाऱ्यांनी कांदा चाळीवर चढून पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात कांदा सडलेल्या अवस्थेत असल्याचे आढळले. याबाबत पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करून त्यावर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या.

" 'नाफेड' व 'एनसीसीएफ'द्वारे करण्यात आलेली कांदा खरेदी शासनाच्या निकषांनुसार असल्याचे दिसून आले नाही. गोडाऊनमध्ये आढळलेला कांदा सडलेला असल्याची नोंद तक्रारदार व पंचांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल जिल्हा उपनिबंधक व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आला आहे."
— प्रेरणा शिवदास, सहाय्यक निबंधक, चांदवड.
"दक्षता समितीने तपासणीसाठी तयार केलेल्या प्रश्नावलीत सडलेल्या कांद्याबाबत नेमका प्रश्नच नाही. त्यामुळे केवळ पाहणी करून दक्षता घेतल्याचा देखावा न करता या संपूर्ण प्रकरणाचा सर्वंकष चौकशी करण्यात यावी. प्रत्यक्षात साठवणूक केलेला कांदा पूर्णतः सडलेला आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि निधीचा उपयोग शेतकऱ्यांच्या हितासाठीच झाला पाहिजे."
— गणेश निंबाळकर, जिल्हाध्यक्ष, प्रहार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT