मालेगाव (नाशिक) : शहरासह परिसरातील रस्ते विकास, महामार्गावरील उड्डाणपूल, वाढत्या वाहतुकीवरील नियंत्रण यांसह जिल्ह्यातील प्रमुख गावांच्या बायपास रस्त्यांना चालना मिळावी, यासाठी राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी बुधवारी (दि. 24) केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी दोघांमध्ये रस्ते विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
मुंबई - आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलांचे काम लवकर मार्गी लावण्यासाठी मंत्री भुसे यांनी आग्रह धरला. या भेटीदरम्यान नाशिक व मालेगाव शहरांतील रस्ते वाहतूक आणि रस्ते विकास कामांसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. प्रस्तावित व सुरू असलेली रस्ते विकास कामे जलद गतीने पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा मंत्री भुसे यांनी व्यक्त केली.
या विकासकामांसाठी मंत्री दादा भुसे आग्रही
राष्ट्रीय महामार्ग 60- पाटणे फाटा ते राष्ट्रीय महामार्ग-160 वरील वडगाव जंक्शन 22 किमीचा व्यापक बायपास मंजूर करणे.
शहराच्या वाढत्या वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करणे.
चाळीसगाव फाटा उड्डाणपुलाच्या रचनेबाबत समन्वय साधावा.
झोडगे, चंदनपुरी उड्डाणपुलाचे बांधकाम.
सेवा मार्गाचे त्वरित अपग्रेडेशन आणि रुंदीकरण.
मालेगाव शहर व परिसरातील वाढत्या वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच नागरिकांचा सुलभ, सोपा प्रवास व्हावा यासाठी मंत्री भुसे यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांचे विविध महत्त्वपूर्ण रस्ते विकास प्रकल्पांकडे लक्ष वेधले. यावेळी झालेल्या चर्चेत मंत्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या विकास प्रकल्पांच्या मंजुरी व अंमलबजावणीमुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास व अपघातांचे प्रमाण घटण्यास मदत होईल. व्यापारी व उद्योग क्षेत्रांना जलद व सुरक्षित दळणवळण होईल. प्रवास वेळ व इंधनाची बचत मोठ्या प्रमाणात होईल. शहर व परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असे मंत्री भुसे यांनी सांगितले.