घोटी (नाशिक) : इगतपुरी तालुक्यात तब्बल सात महिन्यांच्या विक्रमी संततधार पावसानंतर अखेर पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी सुखावला असला, तरी आता त्याच्यावर नव्या संकटाचे सावट आले आहे.
लांबलेल्या खरीप हंगामानंतर एकाचवेळी भात, वरई, नागली यासह इतर पिकांची कापणी सुरू झाल्याने मजुरांची मागणी झपाट्याने वाढली असून, मजुरीचे दर अक्षरशः कडाडले आहेत. एरवी दिवसाला दोनशे ते तीनशे रुपये असलेली मजुरी आता दुपटीने वाढून पाचशे ते सहाशे रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तरीदेखील मजूर मिळणे कठीण झाले असून, शेतकर्यांची तारांबळ उडाली आहे. सात महिन्यांच्या अतिवृष्टीमुळे भातासह खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. रोगराईचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक शेतकर्यांचे चार महिन्यांचे श्रम वाया गेले आहेत. आता हाती आलेले थोडेफार पीक वाचवण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. मात्र, सर्व कामे एकाचवेळी आल्याने मजुरांची टंचाई जाणवू लागली आहे.
शेतकर्यांच्या हाती आलेले पीक विक्रीस जाण्यापूर्वीच शासनाने हमीभाव जाहीर करावा. भात खरेदी केंद्रे प्रत्येक मध्यवर्ती गावात सुरू करून, तत्काळ खरेदी व तत्काळ पैसे अशी व्यवस्था केल्यासच शेतकर्यांना खरा न्याय मिळेल.नवनाथ पाटील गायकर, माजी चेअरमन, आहुर्ली
शेतकरी आज चहूबाजूंनी घेरला गेला आहे. निसर्गाने मारले, व्यापारी काय करतील हे प्रश्नच आहे, आणि शासन मात्र उदासीन आहे. शेतीचा भांडवली खर्च दिवसेंदिवस वाढतो आहे. त्यामुळे शेती परवडेनाशी झाली असून, मजूर आज शेतकर्यांपेक्षा सुखात आहे.पांडुरंग खातळे, माजी सरपंच, कर्होळे