Shalarth ID Scam Pudhari News Network
नाशिक

Shalarth ID Scam | शालार्थ घोटाळ्यात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक

Shalarth ID Scam | राजमोहन शर्माला बीडमधून घेतले ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यभर गाजत असलेल्या बनावट शालार्थ आईडी घोटाळा प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षक राजमोहन हरिप्रसाद शर्मा (वय ५८) यांना पोलिसांनी अटक केली आहे. नाशिकच्या गुंडाविरोधी पथकाने बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथून त्यांचा शोध घेऊन ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील तपासासाठी त्यांना गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले.

नाशिकरोड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घोटाळ्यात शासनाची तब्बल १० कोटी ९ लाख रुपयांहून अधिक फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली. गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी संदीप पवार यांच्या पथकातील पोलिस हवालदार राहुल जगजाप, पोलिस अमवलदार संदीप भुरे, राकेश राऊत आणि गुरू गांगुर्डे यांनी आंबेजोगाई, जिल्हा बीड येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला. त्यानंतर शर्मा यांना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले.

मूळ मंजुरी आदेश नसतानाही वेतन अदा

अटक करण्यात आलेले राजमोहन हरिप्रसाद शर्मा जळगाव येथे वेतन अधीक्षक म्हणून कार्यरत असताना शालार्थ आईडीचे ड्राफ्ट अपलोड करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होते. उपसंचालक कार्यालयाकडून शालार्थ मंजुरी आदेश प्राप्त झालेला नसतानाही, तसेच कार्यालयीन अभिलेखांची पडताळणी न करता संबंधित शिक्षक व शिषकेतर कर्मचाऱ्यांच्या संगणकीय प्रणालीतील नोंदीची सत्यता तपासून न पाहता वेतन अदा करण्यात आल्याचा आरोप आहे. शालार्थ प्रणालीतील नोंदी करताना आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली होती का, तसेच संबंधित नियुक्त्यांना मान्यता नसताना वेतन अदा करण्याची प्रक्रिया कशी पार पडली, याबाबत तपास यंत्रणा अधिक तपास करीत आहे.

११ शाळांतील ९५ शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये अनियमितता


नाशिक विभागांतर्गत जळगाव येथील ११ शाळांमधील ९५ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांना तसेच शालार्थ प्रस्तावांना वैयक्तिक मान्यता नसतानाही, मागील तारीखच्या नियुक्त्या दाखवून बनावट शालार्थ आदेशांच्या आधारे शालार्थ प्रणालीमध्ये नोंदी करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. या नोंदीच्या आधारे संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन आणि थकबाकीच्या स्वरूपात रक्कम अदा करण्यात आली. या प्रकरणात संबंधित मुख्याध्यापक, संस्थाचालक, तत्कालीन शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षक आणि इतर संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास


पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आणि पोलिस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. सहायक पोलिस आयुक्त सचिन बारी, सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके, पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण, पोलिस निरीक्षक रितेश अहिरे, सहायक निरीक्षक उमेश बोरसे, उपनिरीक्षक किरण शेवाळे, ग्रेड पोलिस उपनिरीक्षक चव्हाण, हवालदार शिवाजी कुलकर्णी व संदीप बागल, तसेच शिपाई योगेश पवार आणि वैभव खांडेकर हे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT