नाशिक : मराठी पत्रकार दिनानिमित्त नाशिक शहर पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार गौरव सोहळ्यात मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना दै. पुढारीचे सतीश डोंगरे. समवेत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आदी. 
नाशिक

पत्रकारितेमुळे वाचनसंस्कृती आजही टिकून : आमदार फरांदे

नाशिक शहर पत्रकार संघातर्फे पत्रकारांचा गौरव

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पत्रकारितेमुळे राजकारण आणि शासकीय यंत्रणेमध्ये अजूनही आदरयुक्त भीती कायम आहे. त्यामुळेच पत्रकारितेच्या माध्यमातून आजही अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फुटण्यास मदत होत आहे. आजच्या सोशल मीडियाच्या युगातही पत्रकारितेमुळे वाचनसंस्कृती कायम असल्याचे प्रतिपादन आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केले.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई संचलित नाशिक शहर पत्रकार संघाच्या वतीने सोमवारी (दि. ६) मराठी पत्रकारितेचे जनक, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मविप्र समाजाच्या कर्मवीर बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात पत्रकार गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, महिला संचालक शालिनी सोनवणे व शोभा बोरस्ते आदी उपस्थित होते. दै. पुढारीचे प्रतिनिधी सतीश डोंगरे यांच्यासह विविध दैनिकांच्या पत्रकारांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आ. फरांदे पुढे म्हणाल्या की, पत्रकार आहे म्हणून आजही लोकशाही टिकून आहे. अन्यथा अंदाधुंदी निर्माण झाली असती. पत्रकारितेचा दबदबा आजही कायम आहे. लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभामुळे आजही गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांना न्यायाची अपेक्षा असून, सध्याच्या परिस्थितीत वाचनसंस्कृती कुणामुळे टिकून असेल तर ती केवळ आणि केवळ वृत्तपत्रांमुळेच. यावेळी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पत्रकारांना शुभेच्छा व्यक्त करताना पत्रकारांना आरोग्य रक्षणाचा सल्ला दिला.

इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियामुळे वृत्तपत्रांसमोर आव्हान उभे राहू शकते, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र प्रिंट मीडिया आजही तेवढ्याच ताकदीने उभा आहे. समाजाला वृत्तपत्रांची गरज आहे, असे मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस डॉ. नितीन ठाकरे यांनी सांगितले. ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र तनपुरे यांनी प्रास्ताविकाद्वारे पत्रकारांचे प्रश्न मांडले. मराठी अभिनेते किरण भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. तर नाशिक शहर पत्रकार संघाचे पदाधिकारी संपत देवगिरे यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT