नाशिक : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती मार्फत की, स्वबळावर याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार घेतील, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिले. मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर आक्षेप घेवून नाव कमी करण्याची एक प्रक्रिया असते. उमेदवार यादीचा पूर्ण अभ्यास करतो. त्यानंतरच अंतिम यादी प्रसिद्ध होते, असे नमदू करत विरोधक मात्र मतदारयाद्याबाबत 'फेक नेरेटिव्ह' तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी गुरूवारी (दि. १६) उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील शहर-ग्रामीण भागातील निवडक मंडल अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. चव्हाण म्हणाले, मतदार याद्या या निर्दोष असाव्यात असे सर्वांचेच मत असते. यादीत नाव नोंदणी, त्यावर आक्षेप घेण्यासाठीची एक प्रक्रिया असते. निवडणूका घोषित झाल्यावर आयोगाकडून यादीवर आक्षेप घेण्यासंदर्भात प्रक्रिया राबवतात. त्यावेळी प्रत्येक उमेदवार हा मतदार यादीचा अभ्यास करतो. ही सर्व प्रक्रिया पारदर्शक आणि जाहीरपणे पार पाडली जाते. यादीबाबत जो आक्षेप असतो, तो ग्राह्य धरला पाहिजे असा प्रत्येक उमेदवाराचा आग्रह असतो. त्यामुळे ही सगळी वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. परंतु, विरोधक मात्र मतदारयाद्यांबाबत फेक नेरेटिव्ह तयार करत आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. मतदार यादीबाबत निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार निवडणूक आयोगालाच असतात, असे चव्हाण यांनी सांगितले.
कार्यकर्ता पक्षाचा आदेश पाळतो
निवडणुका स्वबळावर लढण्याबाबतचा विषय बैठकीचा नाही. हा निर्णय वरीष्ठांचा आहे. कार्यकर्ता हा निवडणुकीची वाट पाहत असतो. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या इच्छेप्रमाणे निवडणूका लढल्या गेल्या पाहिजे असे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते, असे नमूद करताना निवडणूका जवळ आल्यावर वरीष्ठ पातळीवर महायुतीबाबत निर्णय घेतला जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले. कार्यकर्ता हा शिस्तप्रिय असतो. त्यामुळे पक्षाचा जो काही निर्णय असतो तो पाळतो असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.