नाशिक : पुढारी वृत्तसेवा
माघ शुक्ल सप्तमी म्हणजेच रथसप्तमी सूर्यदेवाच्या उपासनेचा पवित्र आणि महत्त्वाचा दिवस. या या दिवशी सूर्य आपल्या स्थावर आरुढ होऊन उत्तरायणाचा वेग वाढवतो, अशी पौराणिक मान्यता आहे. रथसप्तमीला सूर्यजयंती तसेच आरोग्यदायी पर्व म्हणून विशेष महत्त्व आहे. त्याचा जागर करण्यासाठी रविवारी (दि. २५) शहराती ल विविध भागांत सामुदायिक सूर्यनमस्काराचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
रथसप्तमीच्या पहाटे उगवत्या सूर्याला अर्घ्य देत सूर्यनमस्कार घालण्याची परंपरा आहे. 'ॐ आदित्याय नमः' या मंत्रोच्चारासह केलेली उपासना मन, शरीर आणि आत्म्यास सकारात्मक ऊर्जा देते, असा विश्वास आहे. भक्तांकडून सात पानांवर उभे राहून स्नान करण्याचीही प्रथा पाळली जाते, जी आरोग्याशी निगडित मानली जाते.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून सूर्यप्रकाशामुळे शरीरातील व्हिटॅमिन-डी मिळते, रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि मानसिक ताणतणाव कमी होतो. त्यामुळे रथसप्तमी ही केवळ धार्मिक परंपरा न राहता, आरोग्य जागृतीचा संदेश देणारा दिवस ठरतो. दरम्यान, या दिवसाचे औचित्य साधून शहरातील विविद मंदिरांत विशेष अभिषेक, सूर्यदेवाची पूजा तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. श्रद्धा, आरोग्य, ऊर्जा यांचे अद्भुत संमेलन असलेल्या रथसप्तमी निमित्त शहर व परिसरात सकाळपासूनच कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
सूर्य आपल्या सृष्टीची देवता आहे. रथसप्तमीस आरोग्याचा विचार केल्यास सूर्याची उपासना आवश्यक असते. शरीरातील हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी व्हिटॅमीन सूर्यापासूनच मिळते. याशिवाय सूर्यप्रकाशाने घरातील जंतूही मरत असल्याचे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. यंदा रथसप्तमीच्या औचित्यावर सामुदायिक सूर्यनमस्काराचा उपक्रम राबवता यावा, यासाठी गेल्या महिनाभरापासून वर्ग सुरू आहेत. सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे. -विश्वास मंडलिक, योगविद्या गुरुकुल
रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनमस्कार घालणे शारीरिक आणि मानसिक कल्याणासाठी, तसेच निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहे. दरवर्षी आम्ही शहरातील विविध शाळांमध्ये दीड ते दोन हजार विद्यार्थ्यांसमवेत सामुदायिक सूर्यनमस्कार हा उपक्रम राबवतो. सूर्यनमस्कारामुळे आरोग्याबरोबरच बुद्धीचाही विकास होतो. मनही प्रसन्न राहते. -डॉ. काजल पटणी, संस्थापक, गीत योगा फिटनेस अकॅडमी