चांदवड : पुढारी वृत्तसेवा
शहरातील सोमवार पेठ येथील वेशीच्या प्रवेशद्वारावर कोरलेला अठराव्या शतकातील फारसी शिलालेख चांदवडच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचा महत्त्वपूर्ण पुरावा ठरत आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूच्या वरील भागात कोरलेला हा उठाव स्वरूपातील तीन ओळींचा शिलालेख असून, त्यामध्ये फसली ११६४ अर्थात सन १७५७ मधील बांधकामाची नोंद आढळते.
शिलालेखात मल्हारराव होळकर आणि शहाजी दाभाडे यांच्या नावांचा उल्लेख असल्यामुळे त्याला ऐतिहासिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हा शिलालेख अनेक वर्षांपासून उघड्यावर असल्यामुळे वातावरणाच्या परिणामामुळे त्यावरील काही अक्षरे झिजली असून, मजकूर काही प्रमाणात पुसट झाला आहे.
मात्र, प्रयत्नपूर्वक त्याची छाप घेऊन त्यावरील मजकूर वाचला आहे. शिलालेख फारसी भाषेत असून, त्यात प्रवेशद्वाराच्या बांधकामाची तसेच त्याच्या दुरुस्तीची नोंद काव्यात्मक शैलीत केली आहे. शिलालेखाच्या वाचनानुसार, होळकर घराण्यातील प्रतिष्ठित सरदार मल्हारराव होळकर यांच्या कारकिर्दीत सोमवार पेठेतील प्रवेशद्वाराचे काम पूर्ण केले. फसली ११६४ हे वर्ष शिलालेखात नमूद केलेले असून, त्याचा कालावधी सन १७५७ असा दिला आहे. तसेच शहाजी दाभाडे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे काम पूर्णत्वास गेल्याचा उल्लेख आढळतो.
मराठा काळातील पुरावा:
या शिलालेखातून अठराव्या शतकातील सार्वजनिक बांधकामे, प्रशासकीय पद्धती आणि तत्कालीन फारसी भाषेचा वापर याबाबत महत्त्वाची माहिती मिळते. मराठा कालखंडात फारसी भाषेचा प्रशासकीय व शिलालेखीय वापर होत असल्याचेही यावरून स्पष्ट होते. फसली कालगणनेचा उल्लेख असल्यामुळे तत्कालीन प्रशासनातील कालगणना पद्धतीचाही संदर्भ मिळतो.
मल्हारराव होळकर यांचा उल्लेख तसेच शहाजी दाभाडे यांच्या सहभागाची नोंद असल्यामुळे स्थानिक पातळीवरील प्रशासकीय अधिकारी व सरदार सार्वजनिक बांधकामांमध्ये सहभागी होत असल्याचे दिसून येते. प्रवेशद्वाराच्या बांधकामाची किंवा दुरुस्तीची स्मृती जपण्यासाठी शिलालेख कोरण्याची परंपराही यातून अधोरेखित होते.
संवर्धनाची गरज:
चांदवडच्या ऐतिहासिक व स्थापत्य वारशाचा भाग असलेला हा शिलालेख सध्या वातावरणाच्या परिणामामुळे झिजत असल्यामुळे त्याचे तातडीने संवर्धन व संरक्षण होणे गरजेचे आहे. अशा ऐतिहासिक दस्तऐवजांचे जतन शास्त्रीय पद्धतीने केल्यास चांदवडच्या अठराव्या शतकातील इतिहास, स्थापत्यकला, प्रशासन आणि तत्कालीन सामाजिक-सांस्कृतिक परिस्थितीच्या अभ्यासासाठी मोठी मदत होऊ शकते. शिलालेखाचे वाचन मोहम्मद तारिक रसूल यांनी केले आहे. शिलालेख संशोधन अनिल दुधाणे यांनी केले असून, माहिती व संकलन अनिल किसन दुधाणे यांचे आहे. या संशोधन कार्यात करण सोनी, अतुल पवार आणि डॉ. शैलेंद्र भांडारे यांचे सहकार्य लाभले.