नाशिक : गजलेतील नजाकत आणि नज्म मधील साैंदर्य उलगडणाऱ्या बाबाज थिएटर्स आयोजित आणि आनंद स्वर प्रस्तुत 'गजले और नज्मे' मैफलीत रसिक मंत्रमुग्ध झाले. विविध गजल गायकांच्या अर्थपूर्ण गजलांचे सुरेल सादरीकरण आणि त्याला रसिकांची योग्य जागी मिळालेली 'क्या बात है'ची उत्स्फूर्त दाद यामुळे मैफलीत रंगत चढली.
बाबाज थिएटर्स आयोजित संगीत मैफल आणि कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे ५९पुष्प शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात 'गजले और नज्मे' मैफलिने बुधवारी (दि.१) गुंफण्यात आले. यावेळी प्रसिद्ध गायक आनंद अत्रे आणि ॲड. प्राजक्ता अत्रे-गोसावी यांनी गजला, नज्म सादर केले. 'सोई हुइ रुह पे' आणि 'पत्ता पत्ता बुटा बुटा, हाल हमारा' या गजलांनी मैफलीला प्रारंभ झाला. नंतर 'ओठोसे छुलो तुम' या आणि अशा अनेक गजल आणि नज्म या अत्रे बंधु-भगिनींनी सुरेल सादर केल्या. त्यांना गोविंद क्षीरसागर(तबला), हितेश्वर पाटील (ॲक्टोपॅड), आशुतोष सूर्यवंशी ( हॉर्मोनियम) आणि विजय धुमाळ (सिंथेसायझर) वर साथ दिली.
याप्रसंगी मंचावर ज्येष्ठ साहित्यिक प्र. द. कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार सुधीर कावळे, ॲड. इंद्रायणी पटणी, शामराव केदार, जे. पी. जाधव, योगिता पाटील, संजय पटेल आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिल्पा फासे यांनी केले.
कृतज्ञता सन्मानाचे मानकरी असे...
प्र. द. कुलकर्णी, सुधीर कावळे यांच्या हस्ते सुप्रसिद्ध अभिनेते हेमंत गव्हाणे ( सांस्कृतिक क्षेत्र ), मोना हेमराजानी ( सामाजिक) आणि उमेश कुंभोजकर (क्रीडा) यांना मान्यवरांच्या हस्ते कृतज्ञता सन्मान देऊन सन्मान करण्यात आला.