Ramkund Nashik 
नाशिक

Ramkund Nashik | गोदाघाटाचे विद्रूपकरण; मनसेच्या इशाऱ्यानंतर तात्काळ काढले ऑइल पेंटचे निशाण

Ramkund Nashik | छटपूजेसाठी उत्तर भारतीय लोकांकडून ऑइल पेटनी नावे काढत जागा आरक्षित करण्याचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

नाशिक (पुढारी वृत्तसेवा):

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कोटीवधी रुपये खर्च करून सुशोभित करण्यात येत असलेल्या रामकुंड आणि गोदाघाट परिसरात छटपूजेच्या निमित्ताने ऑइल पेटनी नावे लिहून जागा आरक्षित करण्याचा प्रकार समोर आला आहे. उत्तर भारतीय लोकांकडून घाटाच्या पायांवर आणि चौथ्यांवर नावे, मोठी फुली तसेच गोलाकार चिन्हे काढून परिसराचे विद्रूपकरण करण्यात आले होते.

या प्रकाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा देताच संबंधित यंत्रणेकडून या ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. महापालिकेने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने रामकुंड आणि गोदाघाट परिसराच्या सुशोभिकरणासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला आहे.

देशातून बाहेरून भाविक आणि पर्यटक या परिसराला भेट देणार असल्याने घाटाचे सौंदर्य आणि स्वच्छता टिकवणे महत्त्वाचे आहे. मात्र, छटपूजेच्या पार्श्वभूमीवर काही नागरिकांनी घाटाच्या पायांवर आणि चौथ्यांवर तैलरंगाने स्वतःची नावे लिहून तसेच विशिष्ट खुणा करून पूजेसाठी जागा आरक्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नव्याने विकसित केलेल्या घाटाचा विद्रूप झाल्याचा आक्षेप गोदाप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींनी घेतला होता.

या प्रकाराची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित प्रकाराला तीव्र विरोध दर्शवला. आगामी कुंभमेळ्यासाठी सुशोभिकरणाची कामे सुरू असताना अशा कृती खपवून घेतली जाणार नाही, अशी भूमिका मनसेने मांडली.

तसेच घाटावरील तैलरंग तातडीने हटवून परिसर पूर्ववत स्वच्छ करावा, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली, भविष्यात अशा प्रकारे घाटाचे विद्रूपकरण केल्यास मनसे स्टाईल तीव्र आंदोलन छेण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

प्रशासनाकडून संबंधितांना समज

मनसेच्या भूमिकेनंतर संबंधित यंत्रणेने ऑइल पेटनी आखणी केलेल्या जागांची तात्काळ स्वच्छता केली. संबंधितांना सार्वजनिक परिसराची स्वच्छता आणि जतन करण्याबाबत समज देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके म्हणाले की, "रामकुंड आणि गोदाघाट हा केवळ नाशिकचा नव्हे, तर संपूर्ण देशाच्या श्रद्धेचा विषय आहे.

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून स्वतःच्या नावाने जागा आरक्षित करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, अन्यथा मनसे स्टाईल उत्तर दिले जाईल." यावेळी मनसेचे शहर उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, विजय ठाकरे, किरण क्षीरसागर, अमित गांगुडे, योगेश घोडे, अर्जुन वेताळ, संदीप दोंदे, कैलाश मोरे, तुषार जगताप, ललित वाघ, प्रफुल्ल बेनमेरू आदी मनसेैनिक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT