जुने नाशिक : मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान पर्व अंतिम टप्प्यात आला असून, मशिदींमध्ये तराविहच्या नमाजवेळी अलविदापठण होत आहे. ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली आहे. ईदच्या दिवशी तयार केल्या जाणार्या शीरखुर्मासाठी सुकामेवा, शेवईसह कपडे, अत्तर, टोप्यांची दुकाने सजली आहेत.
गेल्या 20-25 दिवसांपासून शहर व परिसरात रमजानचे वातावरण दिसून येत आहे. बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. शहरातील सर्व मशिदींवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. रविवारी (दि. 30) रमजानच्या उपवासाचा 29 वा दिवस असल्याने, चंद्रदर्शन होण्याची दाट शक्यता आहे. चंद्रदर्शन झाल्यास सोमवारी (दि. 31) रमजान ईद (ईद- उल- फित्र) साजरी केली जाईल. ऐतिहासिक शाहजहाँनी ईदगाह मैदानावर ईदचे सामूहिक नमाजपठण केले जाते. ईदगाह मैदानाची स्वच्छता तसेच तेथील मुख्य वास्तूच्या रंगरंगोटीचे काम सुरू होत आहे. मैदानाची साफसफाई, सपाटीकरण, खड्डे बुजवण्याचे कामही महापालिकेतर्फे केले जात आहे. सामूहिक नमाजच्या पार्श्वभूमीवर, ईदगाहच्या दोन्ही बाजूंनी प्रवेशद्वाराच्या आत ‘वुजू’साठी तात्पुरती पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली जाणार आहे.
सलग 30 दिवस चालणारे रमजान पर्व हा इस्लामिक संस्कृतीतील मोठा सण म्हणून ओळखला जातो. रमजान ईद अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे मुस्लीमबहुल भागात उत्साह दिसून येत आहे. जुने नाशिक परिसरातील बाजारपेठा रात्री उशिरापर्यंत गजबजलेल्या असतात. सारडा सर्कल ते शहीद अब्दुल हमीद चौक हा रस्ता येथे लागणार्या विविध वस्तूंच्या दुकानांमुळे दुपारी 4.30 ते रात्री 11 पर्यंत वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे.