नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या धर्मध्वजारोहण सोहळ्यासाठी गोदातीरी हजारो भाविकांची मांदियाळी जमली होती. सर्वत्र भक्तिमय वातावरण, संत-महंतांचे दर्शन आणि धर्मध्वजेच्या स्वागताचा उत्साह ओसांडून वाहत होता. अशात राम आणि सीतेच्या वेशभूषेत आलेल्या एका दाम्पत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
भगव्या वस्त्रांतील राम आणि सीतेचे रूप साकारत हे दाम्पत्य गोदातीरी दाखल होताच भाविकांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. अनेकांनी त्यांच्यासोबत छायाचित्रे काढत या अनोख्या भक्तिरूपाचा आनंद घेतला.
या दाम्पत्याला रामकुंड परिसरातील मुख्य सोहळस्थळी जाऊन धर्मध्वजारोहण सोहळा अनुभवायचा होता. मात्र, आवश्यक प्रवेशिका नसल्याने देवमामलेदार मंदिर येथूनच त्यांना परत पाठवण्यात आले. मुख्य सोहळस्थळी प्रवेश मिळाला नसला, तरी त्याबद्दल कोणतीही नाराजी व्यक्त न करता रामाची भूमिका साकारलेल्या तरुणाने दिलेली प्रतिक्रिया उपस्थांच्या मनाला भावली.
'प्रभू श्रीरामांनी चौदा वर्षांचा वनवास भोगला. त्यांच्या त्यागाच्या तुलनेत मला प्रवेश मिळाला नाही, तर त्यात काय फरक पडणार? रामाच्या त्यागापुढे आपला त्याग काहीच नाही,' अशा शब्दांत त्याने आपली भावना व्यक्त केली. त्यानंतर 'जय श्रीराम'चा जयघोष केला. त्याच्या या उत्स्फूर्त प्रतिसादेला उपस्थित भाविकांनीही जयघोषाने प्रतिसाद दिला.
मुख्य सोहळ्यात प्रवेश मिळाला नसला, तरी राम-सीतेच्या रूपातील या दाम्पत्याने गोदातीरी भक्तीचा वेगळाच रंग भरला. काही क्षणांसाठी का होईना, रामायणातील प्रसंग जिवंत झाल्याची अनुभूती भाविकांना मिळाली. धर्मध्वजारोहणाच्या मंगलमय वातावरणात या दाम्पत्याचा रामभक्तीचा हा अनोखा आविष्कार उपस्थितांच्या स्मरणat राहिला.