राजापूर : राजापूर-ममदापूर राखीव वनसंवर्धन क्षेत्रात हिरवळीवर सुरू असलेला हरणांच्या कळपाचा मुक्तसंचार. (छाया : लक्ष्मण घुगे)
नाशिक

Rajapur Forest |राजापूर- ममदापूर वनक्षेत्र बहरले

पुढारी वृत्तसेवा

राजापूर (नाशिक) : येवला तालुक्याच्या पूर्व भागातील राजापूर-ममदापूर राखीव वनसंवर्धन क्षेत्रात आभाळमाया होऊन हिरवळ पसरली आहे. दुष्काळानंतर पाऊसपाण्याने फुटलेल्या नवपालवीवर हरीण, काळवीट यांचा नेत्रसुखद मुक्त संचार पाहायला मिळत आहे.

राजापूर-ममदापूर राखीव वनक्षेत्रातील वडपाटी पाझर तलाव परिसरात हरीण, काळविटांसह वन्यप्राणी मोठ्या प्रमाणावर आहेत. सध्या अंदाजे सहा ते सात हरीण, काळवीट या जंगलात भटकंती करत आहेत. काही वर्षांपूर्वी वन्यप्राण्यांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले होते. तेव्हा वनविभागाने जंगलात ठिकठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करून गवत लागवड केली होती. हेमाटा, दररथ, मारवेल, अंजन अशी काही गवती रोपे लागवड केल्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. हरीण व काळविटांच्या संख्येत वाढ झाली आहे. शिवाय, त्यांच्या मृत्यूचे प्रमाणही घटले आहे.

निसर्गरम्य वातावरण, कृत्रिम पाणवठे, अमृत सरोवर परिसरात पर्यटकांना फिरण्यासाठी चार्जिंग कार उपलब्ध आहे. जंगलात गवत वाढल्याने हरीण, काळवीट यांची शेत शिवारातील भटकंती काहीसी थांबली आहे.
अनिल अलगट व राजेंद्र घुगे, शेतकरी, राजापूर

राजापूर वनविभागाला साडेसात हजार वनक्षेत्र लाभले असून, या परिसरात राजापूर, ममदापूर, सोमठाण जोश, खरवंडी, देवदरी, रेंडाळा, कोळगाव या गावांचा समावेश होतो. यापैकी साडेपाच हजार हेक्टरवर राजापूर-ममदापूर राखीव वनसंवर्धन क्षेत्र हा प्रकल्प आहे. राजापूर, ममदापूर, खरवंडी, देवदरी, सोमठाण जोश या पाच गावांत पशुपक्ष्यांच्या संरक्षणासाठी २०१४ मध्ये पथके तयार केली गेली. हरीण, काळवीट, नीलगाय, तरस, लांडगा, रानडुक्कर, ससे, कोल्हे, सायाळ, मोर, घार, टिटवी, चिमणी, कावळे व अनेक वन्यप्राण्यांचा अधिवास विकसित झाला आहे.

राजापूर-ममदापूर राखीव वनसंवर्धन क्षेत्रात वन्यजिवांना सुरक्षित अधिवास दिला जात आहे. गवत लागवडीच्या दिशेने व्यापक काम होते आहे. जंगलात ठिकठिकाणी मनोरे उभारले आहेत. शिवाय, सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. जंगलातील हालचाली कॅमेऱ्यात कैद होत आहेत.
अक्षय मेहत्रे, वनपरिक्षेत्र अधिकारी, येवला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT