नाशिक

Lok sabha Election 2024 Results : नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांच्या विजयाची चाहूल; सेलिब्रेशन सुरू

गणेश सोनवणे

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणी प्रक्रीयेत अठराव्या फेरीअंती महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी 1 लाख 46 हजारांची आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. याबाबतचे वृत्त मिळाल्यानंतर राजाभाऊ वाजे यांचे सिन्नर येथील 'शिवबापूर' निवासस्थान व संपर्क कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोष सुरु केला.

सकाळी निकालाचे अपडेट घेत राजाभाऊ वाजे यांनी नाशिककडे प्रस्थान केले. नाशिक लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासून वाजे यांची आघाडी होती. ती अठराव्या फेरीपर्यंत कायम राहीली. त्यामुळे राजाभाऊ वाजे यांचा मोठ्या मताधिक्कयाने विजय होईल, अशी चिन्हे दिसू लागली. राजाभाऊंच्या विजयाची चाहूल लागल्यानंतर कार्यकर्त्यांनी वाजे यांचे संपर्क कार्यालय व निवासस्थानाजवळ गर्दी केली. फटा्नयाची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करीत विजयी घोषणाबाजी सुरु केली.

राजाभाऊ वाजे यांचे वडील ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे हे या ठिकाणी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. काही कार्यकर्त्यांनी आशीर्वादही घेतले. महिला पदाधिकारी व माजी नगरसेविका यांनीदेखील आनंदोत्सवाला सुरुवात केल्याचे बघायला मिळाले.

झळकले खासदारकीच्या शुभेच्छा देणारे फलक

सिन्नर शहरात गेल्या काही दिवसांपासून राजाभाऊ वाजे यांच्या फोटोंखाली 'खासदार' असा उल्लेख असलेले बॅनर झळकले होते. काही कार्यकर्त्यांनी तर राजाभाऊंना थेट खासदारकीची नेमप्लेटही भेट दिली होती. आज राजाभाऊ वाजे यांची विजयाकडे वाटचाल होत असल्याचे दिसताच सिन्नर शहरात ठिकठिकाणी राजाभाऊ वाजे यांचा लोकसभा निवडणुकीत विजय झाल्याचे गृहीत धरुन शुभेच्छा फलक झळकले.

गळ्यात कांद्याच्या माळा घालून विजयाच्या घोषणा…

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत केंद्र सरकारवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केल्याचे निवडणुकीच्या हाती आलेल्या आतापर्यंतच्या कलांमधून दिसून आले आहे. राजाभाऊ वाजे यांचा विजय दृष्टिक्षेपात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून महाविकास आघाडी, हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह राजाभाऊ वाजे यांच्या विजयी घोषणा दिल्या.

SCROLL FOR NEXT