राजाभाऊंचे संसदेत पहिलेच भाषण इंग्रजीतून file photo
नाशिक

Rajabhau Waje | राजाभाऊंचे संसदेत पहिलेच भाषण इंग्रजीतून, विरोधकांची बोलतीच बंद

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : खेड्यातील माणूस, इंग्रजी काय येणार अशा स्वरुपाच्या लोकसभा निवडणूक प्रचारात विरोधकांकडून झालेल्या टीकेला खासदार राजाभाऊ वाजे यांनी कृतीतून चपखळ उत्तर दिले आहे. संसदेत पहिलेच भाषण अस्खलीत इंग्रजीतून करत, आरोग्य व्यवस्थेबाबत सरकारला तिखट सवाल केलेत. संदर्भ सेवा रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालय, ईएसआयसी रुग्णालयातील अवस्थेकडे लक्ष वेधत वाजे यांनी त्यात सुधारणेची मागणी केली. यासह आदिवासी भागात आरोग्य केंद्राच्या फक्त इमारती उभ्या आहेत. परंतु, डॉक्टर, कर्मचारी यांचा अभाव असल्याने आजही आदिवासी भाग आरोग्य सुविधांपासून वंचित असल्याचे वास्तव मांडले.

नाशिक संदर्भ सेवा रुग्णालयात केंद्र सरकारच्या एनएचएम आणि एनसीडी योजनेअंतर्गत रुग्णांना लाभ मिळावा. तसेच, संदर्भ सेवा रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय साहित्य तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावी, अशी जोरदार मागणी खा. वाजे यांनी केली. यासह, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधांचा आढावा घेऊन त्वरित जिल्हा शासकीय रुग्णालय अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नपूर्वक पावले उचलण्याची आवश्यकता असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

नाशिकच्या तब्बल दोन ते तीन लाख कामगारांच्या एकूण १५ लाखाहून अधिक कुटुंबियांसाठी असलेल्या सातपूरमधील ईएसआयसी रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होत असलेल्या तक्रारीदेखील संसदेत मांडण्यात आल्या. हे रुग्णालय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून चालवण्यात यावे, अशी मागणी खा. वाजे यांनी संसदेत केली. नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आदिवासी बहुल भाग आहे. याठिकाणी अनेकदा आरोग्य व्यवस्थेच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. या आदिवासी भागात आरोग्य विभागाच्या इमारती तर आहेत, मात्र तिथे डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी उपलब्ध नसल्याची वास्तविकता आहे. या मुद्द्याकडे खा. वाजे यांनी संसदेत लक्ष वेध.

..अन‌् रंगली चर्चा

खा. वाजे यांना लोकसभा निवडणूक प्रचारात विरोधकांनी त्यांच्या पेहरावावरून डिवचले होते. इंग्रजी भाषा ज्ञानावरुनदेखील घेरण्याचा प्रयत्न झाला होता. तेव्हा मौन बाळगणाऱ्या वाजे यांनी मात्र, आपले संसदेतील पहिलेच भाषण इंग्रजीतून करत विरोधकांना चपराक लगावल्याची चर्चा रंगली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT