राज्यात लवकरच मोठी राजकीय घडामोड, राज ठाकरे यांचे संकेत  Pudhari Photo
नाशिक

Raj Thackeray | राज्यात लवकरच मोठी राजकीय घडामोड, राज ठाकरे यांचे संकेत

गणेश सोनवणे

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागा. मी सांगेल तेव्हा मुंबईला या. महाविकास आघाडी, महायुतीतील नाराजांवर लक्ष ठेवा. राज्यात लवकरच मोठी राजकीय घडामोड होणार असल्याचे संकेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्याची माहिती समोर येत आहे. नाशिकला पोहोचलेल्या नवनिर्माण यात्रेदरम्यान त्यांनी उत्तर महाराष्ट्र आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला. मात्र, निवडणूक लढविण्याबाबत किंवा रणनीतीबाबत फारशी स्पष्टता दिली नसल्याने बैठकीसाठी आलेल्या इच्छुकांच्या मनात धाकधूक कायम असल्याचे दिसून आले.

दोन दिवसीय नाशिक दौऱ्यादरम्यान राज यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. ६) हॉटेल एसएसके येथे दिवसभर पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या दरम्यान राज यांनी पाचही जिल्ह्यांतील ४७ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांकडून माहिती जाणून घेतली. निरीक्षकांनी सादर केलेल्या अहवालाची पडताळणी केली. काही दिवसांपूर्वी राज यांनी राज्यात निरीक्षकांची नेमणूक करून विधानसभा मतदारसंघनिहाय अहवाल मागविला होता. आढावा बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील ४७ विधानसभा मतदारसंघाच्या अहवालाची जिल्हा तसेच तालुकाध्यक्षांकडून पडताळणी केली. तसेच उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, आगामी काळात राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी होणार असल्याचे संकेत दिले. दरम्यान, बैठकीमुळे हॉटेल मार्गावर दिवसभर कार्यकर्त्यांची ये-जा तसेच कालिका मंदिर मार्गावर यात्रोत्सव असल्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली होती. यावेळी मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे, नेते अविनाश अभ्यंकर, अनिल शिदाेरे, लोकसभा समन्वयक ॲड. किशोर शिंदे, माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी नगरसेवक सलीम शेख, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतनकुमार इचम, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, महिला प्रदेश उपाध्यक्षा सुजाता डेरे, माजी शहराध्यक्ष दिलीप दातीर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

आयात उमेदवारांवर भर

मनसेने आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचे स्पष्ट केले असले तरी, 'सक्षम आणि तुल्यबळ उमेदवार' हा मनसेसमोरील मोठा प्रश्न आहे. अशात इतर पक्षातील नाराजांवर मनसेचा डोळा असणार आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीकडून इच्छुकांची मोठी यादी असल्याने, बंडखोरी वाढण्याची शक्यता आहे. अशात मनसेकडून बंडखोर उमेदवाराला गळाला लावावे, असे आदेशच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

बंद दाराआड चर्चा, सस्पेन्स कायम

राज यांनी पदाधिकाऱ्यांशी बंद दाराआड चर्चा केली. तसेच माध्यमांशी न बोलताच ते मुंबईला निघून गेले. काही पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसे नाशिक पूर्व, मध्य, पश्चिम आणि देवळाली या चारही जागेवर उमेदवार देणार आहे. मात्र, या उमेदवारांची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबतचा सस्पेन्स ठेवल्याने, इच्छुकांमध्ये संभ्रमावस्था वाढली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT