मनमाड (नाशिक): सध्या शाळा आणि महाविद्यालयांना लागलेल्या उन्हाळी सुट्ट्या, सुरू झालेली लग्नसराई आणि थंड हवामानाच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाणाऱ्यांची वाढती संख्या या सर्व कारणांमुळे मनमाड रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या सर्व नियमित तसेच विशेष रेल्वेगाड्यांची आरक्षणे 8 जूनपर्यंत फुल्ल झाली आहेत. हीच स्थिती नाशिक रोड आणि भुसावळ विभागातील इतर प्रमुख रेल्वे स्थानकांवरही पाहायला मिळत आहे. सध्या एकाही गाडीत आरक्षित तिकीट उपलब्ध नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
फक्त रेल्वेच नव्हे, तर एसटी बससह खासगी बसेसचे आरक्षणही फुल्ल झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण होत असल्याचे चित्र आहे. मनमाड रेल्वे स्थानक हे भुसावळ विभागातील महत्त्वाचे जंक्शन असून, येथून दररोज 125 पेक्षा अधिक रेल्वेगाड्या धावतात. जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, तसेच उत्तर भारत, बिहार, पंजाब, पश्चिम बंगालसारख्या राज्यांतील विविध शहरांकडे जाणाऱ्या गाड्या येथे थांबतात. याशिवाय शहरात उत्तर भारतीय नागरिकांची संख्या मोठी असल्याने शाळांना सुट्टी लागल्यानंतर अनेकजण आपल्या गावी परततात. काही प्रवासी पर्यटनासाठी हिमाचल प्रदेश सारख्या थंड हवामानाच्या ठिकाणी जाण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये विशेषतः जास्त गर्दी होत आहे. एकंदरीत, रेल्वे, एसटी आणि खासगी वाहतूक व्यवस्था फुल्ल असल्यामुळे आणि गावी जाणेही आवश्यक असल्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
रेल्वे आरक्षण मिळत नसल्याने अनेक प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सचा पर्याय शोधत आहेत. मात्र तिथेही तिकीट दर वाढलेले असल्याने प्रवाशांची मोठी कोंडी झाली आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता खासगी ट्रॅव्हल्सनी तिकीट दरात मोठी वाढ केली आहे. काही ठिकाणी ही दरवाढ 20 टक्क्यांपासून थेट तिप्पटपर्यंत गेली आहे, त्यामुळे प्रवाशांचा आर्थिक ताण वाढला आहे. एसटी बस सेवाही अपवाद नाही. आरक्षित तिकीट मिळत नसल्यामुळे नागरिक खाजगी वाहनांचा पर्याय वापरू लागले आहेत.