रेल्वेचे खासगीकरण ही विरोधकांची अफवा : रेल्वेमंत्री वैष्णव Pudhari Photo
नाशिक

रेल्वेचे खासगीकरण ही विरोधकांची अफवा : रेल्वेमंत्री वैष्णव

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : मोदी सरकारच्या काळातच रेल्वेत अामूलाग्र बदल झाले. गेल्या १० वर्षांत ४० हजार किलोमीटर लांबीचे नवे रेल्वेमार्ग तयार करण्यात आले. सद्यस्थितीत देशात १२.५० हजार कोटींचे जनरल कोच करण्याचे काम सुरू आहे, असे नमूद करत रेल्वेचे खासगीकरण होणार ही केवळ विरोधकांकडून पसरवली जाणारी अफवा आहे. रेल्वेचे कधीही खासगीकरण होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. नाशिक रोड येथील आरपीएफच्या विभागीय प्रशिक्षण संस्थेच्या विकासासाठी ३५ कोटी रुपयांच्या अनुदानाची घोषणाही यावेळी त्यांनी केली.

नाशिक रोड विभागातील सामनगाव रोडवरील रेल्वे सुरक्षा दला(आरपीएफ)च्या प्रशिक्षण केंद्राच्या ४० व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. वैष्णव यांच्या हस्ते ३३ अधिकाऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. जवानांनी संचलन करून प्रात्यक्षिके सादर केली. खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सीमा हिरे, माजी आमदार बाळासाहेब सानप रेल्वे अधिकारी मीना यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. वैष्णव म्हणाले की, देशात मागील सरकारच्या ४० वर्षांत रेल्वेत पाहिजे त्या प्रमाणात बदल झाला नाही. परंतु २०१४ पासून रेल्वेत बदल सुरू झाला. केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी २.५ लाख कोटींची तरतूद केली गेली. गेल्या १० वर्षांत देशात ४० हजार किलोमीटर रेल्वेमार्गाचा विस्तार झाला आहे. १ लाख ६४ हजार कोटींची कामे सुरू आहेत. १३२ रेल्वेस्थानकांचा त्यात समावेश आहे, अशी माहिती वैष्णव यांनी दिली.

नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प लवकरच

प्रस्तावित नाशिक-पुणे रेल्वे मार्गात नारायणगाव येथील रेडिओ दुर्बिणींचा अडसर आहे. १२३ देशांनी ही दुर्बिणींची मालिका तयार केली आहे. तेथून रेल्वे मार्ग टाकता येत नाही म्हणून हा प्रकल्प रखडला आहे. लवकरच हा प्रकल्प मार्गी लावला जाईल, असे वैष्णव यांनी स्पष्ट केले. नाशिक-शिर्डी आणि नाशिक- डहाणू असे रेल्वे मार्ग टाकण्याचे नियोजन आहे. त्याची पाहणी व डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे. ते झाल्यानंतर नाशिक जिल्हा दक्षिण भारत आणि पश्चिम रेल्वेशी थेट जोडले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

या रेल्वे अधिका-यांचा झाला सत्कार

एस.सी. पार्थ, अनिश प्रसाद, दिनेश चौहान, महेंद्रसिंह शेखावत, नटरवलाल श्रीमाळी, इंद्रजित डे, प्रदीप लोखंडे, हिंमतसिंग नटवत, रणवीरसिंग चौहान, विवेक सागर, महेश्वर सिंह, राजीव कुमार, दशरथ प्रसाद, रमेशचंद्र, बीजेंद्रकुमार राय, सुशांत दुबे, कुंदनलाल वर्मा, शशिकला कुमार, रमेशचंद सिंह, मनोज लोहरा, आलमगीर हुसैन, सतबीर सिंग या अधिकाऱ्यांचा रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रकल्पग्रस्तांचे रेल्वेमंत्र्यांना साकडे

चेहेडी, चाडेगाव, देवळाली येथील प्रकल्पग्रस्त शेतक-यांना रेल्वमध्ये नोकरीत सामावून घेण्याबाबत निवेदन देण्यात आले. चाडेगाव येथील आव्हाड व मानकर मळा येथील रस्त्याबाबत मागणी करण्यात आली. माजी नगरसेवक पंडित आवारे, बाजीराव भागवत, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, सुनील आडके, नाशिक रोड अध्यक्ष शांताराम घंटे, तालुका उपाध्यक्ष प्रसाद जाधव, निवृत्ती अरिंगळे तसेच चेहेडी, चाडेगाव, देवळाली ग्रामस्थ उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT