Manmad-Indore railway line
मालेगाव (नाशिक ) : मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी सुरू असलेल्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेविरोधात तसेच हेक्टरी एक कोटी 60 लाख रुपये दर मिळावा यासह विविध मागण्यांसाठी मालेगाव व नांदगाव तालुक्यातील शेतकर्यांनी सोमवारी (दि.15) मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले.
भूसंपादन व रेल्वे प्रशासनाच्या अधिकार्यांची बाधित शेतकर्यांसोबत येत्या 20 तारखेपर्यंत समन्वय बैठक घेण्यात येईल. सुरू करण्यात आलेले मोजणी काम तत्काळ थांबवण्यात आल्याचे लेखी आश्वासन तहसीलदार विशाल सोनवणे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनामुळे महामार्गावरील दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती. मनमाड-इंदूर नवीन रेल्वेमार्गासाठी मालेगाव तालुक्यातील झोडगे, देवारपाडे, चिखलओहळ, मालनगाव, सवंदगाव, सायणे बुद्रुक, येसगाव, ज्वार्डी, मेहुणे, वर्हाणे, घोडेगाव, काळेवाडी, जळगाव चोंढी आदी 15 गावांतील शेतजमिनी संपादित केल्या जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून मोजणी सुरू करण्यात आली होती. मात्र, योग्य मोबदला व पुनर्वसनाबाबत ठोस निर्णय न झाल्याने शेतकर्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली सकाळी साडेदहापासून रास्ता रोको आंदोलन छेडले. प्रतिहेक्टर एक कोटी 60 लाख रुपये दराने मोबदला देण्यात यावा, कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घ्यावे, तसेच घर, चाळ, फळबागा, पोल्ट्री यांसह होणार्या नुकसानीचा स्वतंत्र मोबदला द्यावा, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी मांडल्या. आंदोलनस्थळी सक्षम अधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. जोपर्यंत सक्षम अधिकारी येऊन लेखी ओशासन देत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. सकाळी साडेदहा ते साडेबारा सुमारे दोन तासांच्या आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस उपअधीक्षक यशवंत बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली तालुका पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक प्रीती सावंजी यांच्यासह अधिकारी व कर्मचार्यांचा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, या आंदोलनापूर्वीच आंदोलकांनी शुक्रवारी अपर जिल्हाधिकार्यांना निवेदन देत रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर तहसीलदार विशाल सोनवणे यांनी घटनास्थळी येऊन मोजणी थांबवण्यासह समन्वय बैठक घेण्याचे लेखी ओशासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले. तथापि, मोजणी प्रक्रिया पार पडल्यानंतरच मूल्यांकन, अधिग्रहण व अन्य प्रक्रिया होतील, असे संबंधित अधिकार्यांनी सांगितले.
गुरुवारी (दि.18) बिर्हाड आंदोलन करणार
बाधित शेतकर्यांच्या मागण्यांना यावेळी अधिकारीवर्ग दाद देत नसल्याने शेतकर्यांत संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.18) बाधित शेतकरी कुटुंबीयांसह तहसील कार्यालयावर आंदोलन करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.